इंद्रायणी तांदळाला पसंती , नसरापूर आठवडे बाजारात मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 02:27 AM2017-12-11T02:27:24+5:302017-12-11T02:27:27+5:30
तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या नसरापूर येथील सुवासिक तांदूळ बाजारात हंगामाची आवकच १०० क्विंटलने झाली. प्रामुख्याने नसरापूर येथील तांदूळ बाजारात इतर जातीच्या तांदळापेक्षा इंद्रायणी जातीच्या सुवासिक तांदळास मोठी मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या नसरापूर येथील सुवासिक तांदूळ बाजारात हंगामाची आवकच १०० क्विंटलने झाली. प्रामुख्याने नसरापूर येथील तांदूळ बाजारात इतर जातीच्या तांदळापेक्षा इंद्रायणी जातीच्या सुवासिक तांदळास मोठी मागणी आहे.
भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नसरापूर येथील उपाबाजारच्या आवारात या वर्षीच्या हंगामातील तांदूळ विक्रीची सुरुवात काटापूजनाने संचालक संपतराव अंबवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदीप चक्के, अरविंद सोंडकर, किरण घारे, मुरलीधर दळवी व संस्थेचे सचिव चंद्रकांत तांदळे, चंद्रकांत साळेकर आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नसरापूर येथील तांदूळ बाजारातील तांदळाच्या प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई व पुण्यातील ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे.
नसरापूर बाजारपेठेत येणारा तांदूळ प्रामुख्याने भोर तालुक्यातील तांभाड, हातवे, सोंडे, मोहरी, दीडघर, जांभळी तर वेल्ह्यातील वांगणी खोºयातील कोळवडी, मांगदरी, कातवडी, वांगणी, करंजावणे, मार्गासनी, वाजेघर, दामगुडास्नी, वेल्हा आदी गावांतील तांदूळ ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे.
या बाजारात व्यापारी व ग्राहक तांदूळ खरेदीसाठी बाजारात आल्याने चोखंदळपणे प्रतीनुसार तांदळाची खरेदी करतात व तांदळाच्या प्रतीनुसारच भाव त्यांच्याकडून दिला जातो.
यावर्षीच्या हंगामात इंद्रायणी तांदळास ४५ ते ५० तर रत्नागिरी तांदळास ३२ पर्यंत भाव मिळत आहे. इंद्रायणीसारखा दिसणारा इंडम तांदूळही बाजारात येऊ लागला आहे. तरीही इंद्रायणी आपले स्थान टिकवून आहे असे भोर कृषी उत्पन्न समितीचे संचालक संपतराव अंबवले
यांनी सांगितले.
या वेळी नसरापूर येथील तांदूळ बाजारात पूर्वी आंबेमोहर, रत्नागिरी २४ व वरंगळ आदी जातीच्या तांदळाला विशेष मागणी होती. त्यातही सुवासिक आंबेमोहोर तांदळाला विशेष पसंती मिळत असे. नसरापूर येथील तांदूळ बाजारात शेतकरी पौष महिन्यातील यात्रांकरिता लागणाºया खर्चाकरिता मोठ्या प्रमाणात तांदळाची विक्री करतात.
भोर व वेल्हे तालुक्यांतील यात्रांचा हंगाम सुरु झाला असल्याने येथील शेतकरी तांदूळ त्वरित विक्रीस आणतात. भोर व वेल्हा तालुक्यांच्या मध्यवर्ती असलेली नसरापूर तांदूळ बाजारपेठ सर्वदूर प्रसिद्ध आहे.