जुन्नरमधील रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:09 AM2021-04-13T04:09:56+5:302021-04-13T04:09:56+5:30
जुन्नर नगरपालिकेने नुकतेच कल्याण पेठ येथील मुख्य रस्त्याचे नव्याने डांबरीकरण केलेले आहे. नव्याने डांबरीकरण करण्यात आल्यामुळे वाहनचालक ...
जुन्नर नगरपालिकेने नुकतेच कल्याण पेठ येथील मुख्य रस्त्याचे नव्याने डांबरीकरण केलेले आहे. नव्याने डांबरीकरण करण्यात आल्यामुळे वाहनचालक बेशिस्तपणे भरधाव वेगाने वाहने चालवीत आहेत. या परिसरात शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, कृष्णराव मुंढे विद्यालय, कॉर्नेल मेमोरियल स्कूल, अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर या चार शाळा आहेत. जुन्नर ओतूर या राज्यमार्गावरून जुन्नर शहरात येताना कल्याण पेठ चर्चपासून रस्त्याला मोठ्या प्रमाणात उतार आहे. परिणामी दुचाकी, चारचाकी, मालवाहू तसेच जड वाहतूक करणारी वाहनांचे वाहनचालक बेदरकारपणे वेगात वाहने चालवितात. परिणामी येथील नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न झाला आहे. कल्याण पेठ मुख्य रस्त्याला सुलोचना बुट्टे मार्ग, बोचरे आळी, दुर्गादेवी मंदिर, तसेच आवटे विद्यामंदिर शाळेच्या लगतचा येणारे जोडरस्ते जोडलेले आहेत. मुख्य रस्त्यावर वाहने वेगात जात असल्याने या जोडरस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनांचे होणारे छोटे मोठे अपघात नित्याची बाब झाली आहे. या जोडररस्त्याची माहिती देणारे फलक या ठिकाणी नाहीत.
जुन्नर नगरपालिकेने डांबरीकरण करताना एका ठिकाणी असलेले रबरी गतिरोधक गाडले गेले आहेत, तर उर्वरित रबरी गतिरोधक निघून गेले आहेत. तीव्र उताराच्या रस्त्यावर कोणतेही गतिरोधक नसल्याने वाहनचालक वाहने जोरात चालवितात. या मुख्य रस्त्यावर जोडरस्त्यांच्या अगोदर डांबराचे गतिरोधक करण्याची तसेच माहितीफलक बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गतिरोधक फक्त दिखाऊ नसावेत तर वेगात येणाऱ्या वाहनाला त्याचा वेग नियंत्रित करावा लागेल असे परिणामकारक असावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
११जुन्नर
जुन्नरमध्ये कल्याण पेठ रस्त्यावर भरधाव वेगात चालविल्याने पलटी झालेले वाहन.