लेझीम पथकांना लग्नात मागणी
By admin | Published: May 6, 2015 06:02 AM2015-05-06T06:02:16+5:302015-05-06T06:02:16+5:30
कायदेशीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डिजिटल व्यावसायिकांवर मोशीमध्ये कारवाई करण्यात येत असल्यामुळे लग्नसराईमध्ये वऱ्हाडी मंडळींकडून डफडी व स्थानिक ढोल-लेझीम पथकाच्या खेळाला प्राधान्य दिेले जात आहे.
मोशी : कायदेशीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डिजिटल व्यावसायिकांवर मोशीमध्ये कारवाई करण्यात येत असल्यामुळे लग्नसराईमध्ये वऱ्हाडी मंडळींकडून डफडी व स्थानिक ढोल-लेझीम पथकाच्या खेळाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या शहरामध्ये विवाहासाठी प्रत्येक वऱ्हाडी मंडळीकडून लाखो रुपये खर्च केले जात आहेत. मान्यवर मंडळींना निमंत्रणपत्रिका देण्यापासून ते मोठमोठे साऊंड सिस्टीम लावून विवाह सोहळे पार पाडले जात होते. परंतु, डॉल्बी सिस्टीमवर मोशीत बंदी घालण्यात आली असून, पारंपरिक ढोल-लेझीम पथक, बँडला मागणी वाढलेली आहे. शहरातील काही भागांमध्ये मात्र अद्यापही मोठ्या आवाजामध्ये डॉल्बी साऊंड सिस्टीम लावली जाते. परंतु, मोशीमध्ये सद्य:स्थितीत डिजिटल व्यवसायावर समस्यांचे संकट उभे ठाकले आहे. दहा हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत अशा साऊंड सिस्टीम डिजिटलचे दिवसाचे भाडे असते. सुरुवातीच्या काळात असे डिजिटल लावणे वऱ्हाडी मंडळींकडून प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात होते. परंतु, काळानुसार बदल होत असून, जुन्या रुढी- परंपरा पुन्हा नव्याने सुरू होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गावामध्ये लग्नसोहळा झाल्यानंतर स्थानिक तरुणांच्या वतीने तालमीचे खेळ सादर केले जात होते.
> अशा ढोल-लेझीम पथकामध्ये सुमारे ४० ते ५० तरुणांचा समावेश असतो. अशी पथके २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत सुपारी घेत आहे. ग्रामीण भागामध्ये त्याकडे एक प्रकारचे व्यवसायाचे साधन समजले जाते. सध्या मोशी चऱ्होली, डुडुळगाव, भोसरी, केळगाव अशा महापालिका समाविष्ट गावांमध्येही ढोल-लेझीम पथकाचा प्रभाव वाढत आहे. ढोल-लेझीम पथकातील तरुणांकडून रोज सराव करून असे पथक सुरू केले जात आहे. थोडक्यात ग्रामीण भागातील जुन्या रुढी, परंपरा, संस्कृती, रितीरिवाज पुन्हा नव्याने सुरू झाल्या आहेत.