कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकरिता मनुष्यबळाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:00+5:302021-03-20T04:10:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यापैकी लक्षणे असलेल्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यापैकी लक्षणे असलेल्यांना वेळीच विलग करण्यास महापालिकेने प्राधान्य दिले आहे. याकरिता आरोग्य विभागाने शिक्षण विभागासह पीएमपीएमलकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकरिता प्रत्येकी ५०० सेवकांची मागणी केली आहे.
शहरात गेल्या दोन दिवसांपासून वर्षभरातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आढळून आली आहे. यापैकी अनेक जण हे होम आयसोलेशनमध्ये राहत असले तरी, त्यांच्या संपर्कातील व्यक्ती, ज्या बाधित आहेत ते इतरांना बाधित करीत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींना शोधून काढण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रत्येकी २५ टीम तयार करण्यात येणार आहेत. याकरिता महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे ५०० शिक्षकांची तर पीएमपीएमलकडे ५०० सेवकांची मागणी करण्यात आली आहे.
-------
प्रत्येक पोलीस ठाण्यात दिली जाणार माहिती
खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर कोरोनाबाधित आलेली व्यक्ती चुकीची माहिती देत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये दिवसाला शहरात सरासरी असे १०० प्रकार उघसकीस येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने पोलीस विभागाशी संपर्क साधला आहे. यानुसार खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीची माहिती यापुढे स्थानिक पोलीस ठाण्यात लागलीच दिली जाणार असून, यामुळे खोटी माहिती देणारे आता पोलिसांच्या रडारवर येणार आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयाने पालिकेने सादर केलेल्या यादीतील व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्यास दिले आहेत.