भिक्षेक-यांचा वात्सल्याचा बाजार

By admin | Published: February 25, 2015 12:50 AM2015-02-25T00:50:34+5:302015-02-25T00:50:34+5:30

‘देवा सुंदर जगामध्ये का रे माणूस घडविलास, घडविलास तो घडविलास अन् दु:खामध्ये बुडविलास’ असं भिक्षेकऱ्यांच्या जीवनाचे सार सांगणारे गीत ऐकले की सहानुभूतीला पारावार उरत नाही

Demand-market bullies | भिक्षेक-यांचा वात्सल्याचा बाजार

भिक्षेक-यांचा वात्सल्याचा बाजार

Next

राहुल शिंदे, पुणे
‘देवा सुंदर जगामध्ये का रे माणूस घडविलास, घडविलास तो घडविलास अन् दु:खामध्ये बुडविलास’ असं भिक्षेकऱ्यांच्या जीवनाचे सार सांगणारे गीत ऐकले की सहानुभूतीला पारावार उरत नाही. पण अशीच सहानुभूती मिळविण्यासाठी शहरात भिक्षेकऱ्यांकडून कोवळ्या, लहान मुलांचा वापर होताना दिसत आहे. या लहान मुलांच्या सहानुभूतीच्या संपत्तीवर लोकांच्या वात्सल्याच्या झऱ्यातून वितभर पोट भरण्याचे वास्तव पुण्यातील रस्त्यांवर सर्रास पाहायला मिळत आहे. कोवळ्या मुलांचं बालपण मात्र रस्त्यावर कोमेजत आहे. भिक्षेकरी असण्याच्या वेदनेचे चटके सोसणारी ही कोवळी मुलं रूक्ष होत चाललीत... मरणपंथाचे सारथी होत! बाबूराव बागुलांच्या ‘मरण स्वस्त होत आहे’ या कथासंग्रहामधील अल्पवयीन सटवा आणि भागा आयुष्याकडे ‘मागतकरी’ म्हणून पाहत असतात आणि लुप्त होतात दुनियेच्या बाजारामध्ये कुठेतरी...! आजही तीच परिस्थिती आहे. जीवनाच्या संघर्षात आजचे सटवा अन् भागा भाकरीच्या शोधात रस्ते धुंडाळताहेत.. नियतीला सलाम ठोेकत...!

शहरातील भिक्षेकरी दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या ५00 ते ६00 लहान मुले तर ११00 - ते १२00 तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग भिकारी भीक मागत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही भीक मागण्यासाठी चिमुकल्या जीवांनाच वेठीस धरले जात आहे. परंतु, काही स्वयंसेवी संस्था वगळता शासन, पोलीस यंत्रणा आणि समाजाकडून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
धर्मादाय सह आयुक्त कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शहरात ५०० ते ६०० लहान मुले तर सुमारे ११०० ते १२०० तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग भिकारी भीक मागत आहेत. सिग्नलवर व उद्यानामध्ये लहान मुले सर्वाधिक प्रमाणात भीक मागताना दिसून येतात. परंतु, मुलांना भीक मागण्यास सांगून, या मुलांचे पालक दूरवर जाऊन उभे राहतात. काही महिला लहान मुलांना कडेवर घेऊन मुलाच्या दुधासाठी, त्याच्या उपचारासाठी भीक द्या, अशी गयावया करून भीक गोळा करतात. त्याचप्रमाणे भीक मागण्यासाठी लहान जीवांना वेठीस धरले जात असल्याचे काही स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडूनही सांगितले जात आहे. पोलीस प्रशासनागे २0१४मध्ये केवळ ६0 भिकाऱ्यांवर कारवाई केली. तसेच सुमारे ३५ लहान मुलांना बाल सुधारगृहात दाखल केले.
भिकाऱ्यांचे पुनर्वसनासाठी शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या भिक्षेकरी सुधारगृहांची संख्या दयनीय आहे. तसेच या सुधारगृहांमध्ये भीक मागणाऱ्या तरुण, वयोवृद्ध व अपंग व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी ठोस उपाययोजना उपलब्ध नाही, असे नमूद करून डॉ. विनोद शहा म्हणाले, की डॉक्टर, वकील असे अनेक जण व्यसनाधिनतेमुळे भीक मागत असल्याचे दिसून आले आहेत. संस्थेने कात्रजजवळ भिलारेवाडी येथे भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सुरू केले आहे. सध्या या केंद्रात ६0 भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनाचे व १00 मुलांना शिक्षण देण्याचे काम केले जात आहे.
शहा म्हणाले, की भिक्षेकऱ्यांना प्राथमिक उपचार मिळाले तर ते समाजात ताठ मानेने जगू शकतात. एक भीक मागणारा मुलगा आता भोसरी येथील एका कंपनीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत आहे. कुठेही आजाराने ग्रस्त असलेला भिकारी दिसून आल्यास आमचे पदाधिकारी त्याच्यावर उपचार करण्यासाठी ससूनमध्ये दाखल करतात किंवा स्वत: जाऊन त्याला आमच्या संस्थेत घेऊन येतात.

Web Title: Demand-market bullies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.