भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पैशांची मागणी
By Admin | Published: May 30, 2017 01:58 AM2017-05-30T01:58:45+5:302017-05-30T01:58:45+5:30
हाताला आलेली गाठ काढण्यासाठी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या वृद्ध महिलेला शस्त्रक्रिया करण्यासाठी पैशाची मागणी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : हाताला आलेली गाठ काढण्यासाठी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या वृद्ध महिलेला शस्त्रक्रिया करण्यासाठी पैशाची मागणी केली आणि त्यातील काही रक्कम देण्यातही आल्याचे महिलेच्या नातेवाइकांनी सांगितले. यामुळे या उपजिल्हा रुग्णालयाचा अजब कारभार समोर आला आहे. दलित, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील वृद्ध महिलेला ही वागणूक मिळत
असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत हौसाबाई गेनू गाडे (वय ९३, रा. आंबवडे, ता. भोर) यांचे नातू संतोष कांबळे यांनी सांगितले की, गेल्या सोमवारी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात हौसाबाई गाडे यांच्या हाताला गाठ आल्याने उपचार करण्यासाठी घेऊन आले होते. त्यानंतर केस पेपर काढुन तपासणी केल्यावर भूल देऊन शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यासाठी ३ हजार खर्च येईल असे सांगितले. त्यापैकी दुसऱ्या डॉक्टरांकडे देण्यास डॉ. राजेश मोरे यांनी सांगितल्यानंतर १ हजार रूपये दिले. पट्टी काढायला आल्यावर बाकीचे पैसे देतो असे सांगितले . त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आल्यावर दोन तास थांबल्याने त्याचे कॉट भाडे म्हणून येथील एका कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून २०० रुपये घेतल्याचा आरोप केला आहे.
याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. राजेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, मी कोणत्याही रुग्णाकडे पैसे मागतले नाहीत आणि कोणी मागितले असतील तर त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
रुग्णालय पक्त नावालाच
सर्वसामान्य गोरगरीब लोकांना खाजगी दवाखाना परवडत नाही, म्हणून शासनाने भोरला सुमारे दीड कोटी खर्च करुन २००१ साली ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आले. मात्र ते फक्त नावालाच असुन रुग्णालयात श्वानदंशाची (कुत्र्याची) लस उपलब्ध नाही. कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.
किरकोळ अपघात झालेला रुग्ण आला तरी गोळ्या औषधे इंजेक्शन देऊन त्याला पुण्याला पाठवले जाते. रुग्णांच्या सेवेकडे दुर्लक्ष केले जाते. स्वच्छता वेळेवर होत नाही. सर्वत्र गवत उगवलेले, घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक रुग्णालय परिसरात मुक्कामी राहात नाहीत. वेळेवर हजर नसतात, मनमानी कारभार सुरु आहे.