नानगाव महिला बचत गटाच्या गोवऱ्यांना परराज्यात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:09 AM2021-04-24T04:09:58+5:302021-04-24T04:09:58+5:30
प्रकाश शेलार केडगाव : नानगाव येथील वेगळ्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या गायीच्या शेणापासून गोवऱ्या तेलंगणा राज्यामध्ये निर्यात झाल्या ...
प्रकाश शेलार
केडगाव : नानगाव येथील वेगळ्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या गायीच्या शेणापासून गोवऱ्या तेलंगणा राज्यामध्ये निर्यात झाल्या आहेत. ॲमेझॉनवर बचत गटांनी तयार केलेल्या मालाची विक्री करणारे नानगाव हे तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे. दोन महिन्यांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके यांनी गावातील महिलांसाठी बचत गटातून रोजगारनिर्मिती कशी करायची या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेवरून शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या सोनाली मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
गावातील दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवती कार्याध्यक्ष आश्लेषा नंदकिशोर शेलार यांनी महिला बचत गटातील प्रत्येक महिलेला रोजगार मिळावा यासाठी २ महिन्यांपूर्वी त्यांना स्वतःच्या गावातून महिला बचत गटाला गायीच्या शेणाची गोवरी बनवायचे ठरवले. तो व्यवसाय यशस्वी ठरला. आता महिला बचत गटातील सर्व महिला व्यवसायातून उत्पन्न कमावणार आहेत. शेणाची गोवरी चांगल्या किमतीला अमेझॉनवर विक्री झाली आहे. प्रथमच तेलंगणा राज्यातील ग्राहकाने ॲमेझॉनवरून गोवऱ्यांची मागणी केली आहे. त्यास किंमत ही चांगली मिळाली आहे. प्रथम मागणीचे कुरियर हे केडगाव पोस्ट ऑफिसमधून तेलंगाना पार्सल हे केले. एका गोवरीची किंमत दहा रुपये आहे. धार्मिक विधीसाठी परराज्यात गोवऱ्यांना मोठी मागणी असते. या वेळी आश्लेषा नंदकिशोर शेलार, महिला बचत गटाच्या तालुकाध्यक्ष निर्जला गुंड, कविता मोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके म्हणाल्या की, महिला बचत गट अनेक पदार्थ तयार करतात, परंतु त्यांना विक्रीसाठी व्यासपीठ नसते. दोन महिन्यांपूर्वी ॲमेझॉनवर बचत गटाने केलेल्या पदार्थांची विक्री कशी करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. नानगाव येथील महिला बचत गटाला विक्रीसाठी ॲमेझॉन हे व्यासपीठ मिळाले. भविष्यामध्ये जिल्हास्तरावर हा उपक्रम राबवायचा आहे.
फोटो ओळी-बचत गटाने शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या तेलंगणा राज्यामध्ये निर्यात करताना आश्लेषा शेलार व महिला प्रतिनिधी.