परदेशात बिगर बासमती तांदळाला मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:32 AM2018-05-08T02:32:35+5:302018-05-08T02:32:35+5:30
भारतातील बिगर बासमती तांदळाला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी असून यंदा देशातून तब्बल ८६ लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली. तसेच बासमती तांदळाची गेल्या वर्षाइतकीच निर्यात झाली असून बिगर बासमती व बासमती मिळून यंदा १२६ लाख टन तांदळाची विक्रमी निर्यात झाली. त्यात इराण व इराक या दोन देशात सर्वाधिक तांदळाची निर्यात झाली.
पुणे : भारतातील बिगर बासमती तांदळाला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी असून यंदा देशातून तब्बल ८६ लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली. तसेच बासमती तांदळाची गेल्या वर्षाइतकीच निर्यात झाली असून बिगर बासमती व बासमती मिळून यंदा १२६ लाख टन तांदळाची विक्रमी निर्यात झाली. त्यात इराण व इराक या दोन देशात सर्वाधिक तांदळाची निर्यात झाली.
बासमती व्यतिरिक्त इतर तांदळाचे उत्पादन घेणाऱ्या देशांत तांदळाचे उत्पादन घटले. तसेच निर्यातीवरील निर्बंधामुळे बिगर बासमती तांदळाला चांगली मागणी आहे. भारतातून सुमारे ७० देशांमध्ये तांदळाची निर्यात केली जाते. त्यात अमेरिका, आॅस्टेलिया, आफ्रिका, युरोप, रशिया, सौदी अरेबिया, इराण, इराक या देशांचा समावेश आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा निर्यातीमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली असून त्यातून २३ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन देशाच्या तिजोरीत जमा झाले आहे.
थायलंड आणि बांगलादेशसह इतर देशांच्या तुलनेत भारतातील तांदळाचे दर कमी होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेपाळ या देशात भारतातील बिगर बासमती तांदळाची मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यात आली. भारत व आशिया खंडातून परदेशात स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या वाढली आहे. या नागरिकांकडून बिगर बासमती तांदळाला पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे. यंदा पाऊस चांगला झाला तर देशातील तांदळाच्या उत्पादनात १ हजार लाख टनापर्यंत वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, असेही शहा म्हणाले.
दरम्यान, केंद्र शासनाने २०१० ते २०११ या कालावधीत भारतातून निर्यात होणाºया बिगर बासमती तांदळावर बंदी घातली होती. बंदी उठविल्यानंतर बासमती व्यतिरिक्त पहिल्याच वर्षी सुमारे ४० लाख टन इतर तांदळाची निर्यात करण्यात आली. २०१६-१७ मध्ये हा आकडा ८० लाख टनावर गेला होता.
एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या आर्थिक वर्षात ४० लाख टन बासमती तर ८६ लाख टन बिगर बासमती तांदूळ परदेशात पाठविण्यात आला आहे. भारतात सर्वाधिक उत्पादित होणाºया आंबेमोहोर, कोलम, इंद्रायणी आदी तांदळाला यंदाही परदेशातील ग्राहकांची पसंती राहिली. गेल्या काही वर्षात पारंपरिक बासमती तांदळाचे उत्पादन घटले असून सुधारित बासमती तांदूळ काही ग्राहकांना न रुचल्याने राज्यासह परदेशात बिगर बासमती तांदळाला मागणी वाढली आहे.
- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष,
फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र