‘फुले, आंबेडकरांवर साहित्य संमेलन भरवण्याची मागणी’
By admin | Published: January 9, 2016 01:29 AM2016-01-09T01:29:03+5:302016-01-09T01:29:03+5:30
महात्मा फुले यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतिवर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याला
पिंपरी : महात्मा फुले यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतिवर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याला वाहिलेले विशेष साहित्य संमेलन मनपाच्या वतीने आयोजित करावे. त्यासाठी बैठक आयोजित करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंचाने आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे.
केंद्र आणि राज्य शासन यांच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून त्यांच्या कार्याला उजाळा मिळत आहे. पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी असून, या नगरीत हजारो कष्टकरी वास्तव्य करीत आहेत.
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृती वर्ष आणि भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी या महामानवाच्या जीवनकार्याला उजाळा मिळेल, अशा साहित्य संमेलनाचे आयोजन १४ एप्रिल २०१६ पूर्वी महापालिकेच्या वतीने करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. सांस्कृतिक जडणघडण अधिक मजबूत होईल, असे मंचाचे अध्यक्ष धम्मराज साळवे आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहराध्यक्ष संतोष जोगदंड यांनी निवेदनात म्हटले आहे.(प्रतिनिधी)