राफेल चौकशीसाठी काँग्रेस रस्त्यावर, संसदीय चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 02:27 AM2018-12-27T02:27:50+5:302018-12-27T02:28:02+5:30
राफेल विमानखरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करीत काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी दुपारी निदर्शने करण्यात आली.
पुणे : राफेल विमानखरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करीत काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी दुपारी निदर्शने करण्यात आली. राफेल व्यवहाराबाबत केंद्र तोंड लपवत असून हिंमत असेल तर त्यांनी ताठ मानेने चौकशीस सामारे जावे, अशी मागणी करण्यात आले.
शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘देशाच्या संरक्षणाशी निगडित अशा अशा गोष्टींमध्येही शंकास्पद असे व्यवहार होतात. त्याचा खुलासा
केला जात नाही. संसदेसमोर काहीही मांडले जात नाही. कोणत्याही आक्षेपांना उत्तर दिले जात नाही. ‘‘काँग्रेसने राफेल विमानांविषयी संशय व्यक्त केलेला नाही, तर विमानांच्या खरेदी व्यवहाराविषयी आक्षेप घेतले आहेत. कशालाच उत्तरे द्यायची नसतील, तर मोदी सरकारने देशातील जनतेसाठी म्हणून खरेदी व्यवहारातील सर्व गोष्टी उघड कराव्यात.’’
न्यायालयाला खोटा अहवाल सादर करण्यापर्यंत भाजपाची मजल गेली आहे, अशी टीका करून बागवे म्हणाले, ‘‘लेखापरीक्षण समितीला कसलाही अहवाल दिलेला नसताना काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाला हा अहवाल दिला, असे सांगितले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, की राफेलसंदर्भात चौकशी करण्याचे कारण नाही.’’ भाजपाचा हा खोटेपणा काँग्रेस ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शनांच्या माध्यमातून देशाला उघड करून सांगणार आहे, असे ते म्हणाले. माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक आबा बागूल, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, संगीता तिवारी, रमेश अय्यर, नीती परदेशी, तसेच काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, विविध आघाड्यांचे प्रमुख या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर जमून भाजपाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
काँग्रेसने उपस्थित केलेल्या शंका असलेले फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना
राफेल विमानांच्या प्रतिकृतीसमवेत मागण्यांचे निवेदन देण्यात आले.