भादलवाडी तलावात पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:21+5:302021-08-18T04:14:21+5:30
डाळज, भादलवाडी, कुंभारगाव, पिलेवाडी या गावातील हजारपेक्षा जास्त एकाहून अधिक क्षेत्र या तलावाच्या सिंचनाखाली येत असल्याने हा तलाव सिंचनाच्या ...
डाळज, भादलवाडी, कुंभारगाव, पिलेवाडी या गावातील हजारपेक्षा जास्त एकाहून अधिक क्षेत्र या तलावाच्या सिंचनाखाली येत असल्याने हा तलाव सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तसेच या तलावात अनेक विदेशी पक्षी फ्लेमिंगो तसेच विविध प्रकारच्या पक्षी आपल्या विणीसाठी या तलावात घरटी करतात ते पाहण्यासाठी अनेक पर्यटकही येत असतात. परंतु पाणी नसल्याने यंदा पक्षी येतात की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या तलावाच्या जवळच्या असणाऱ्या गावांची तहान या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असते. या तलावांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर अडवले जाते, त्यानंतर खडकवासला कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा आधार या तलावाला असतो. परंतु या भागात पाऊस कमी प्रमाणात झाला असून खडकवासला कालव्यातून अजून एकही पाण्याचे आवर्तन झाले नाही. त्यातच शेतकऱ्यांनी चारा पिकसह ऊस, फळबागा आदी पिकांचे उत्पादन केले असून येणाऱ्या काळामध्ये पिके धोक्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात पाटबंधारे विभागाची संपर्क साधला असता ते म्हणाले, तरंगवाडी तलाव भरल्यानंतर भादलवाडी तलावामध्ये पाणी सोडण्यात येईल. परंतु पूर्वी वर्षातून ठराविक कालावधीनंतर मिळणारे आवर्तन अलीकडे बेभरवशाचे झाल्याने या तलावातील परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.