वासुली फाटा ते मिंडेवाडी दरम्यानच्या रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:38+5:302021-04-30T04:13:38+5:30
वासुली आणि शिंदे गाव ही एमआयडीसीमधील महत्त्वाची गावे आहेत. तसेच मावळ तालुक्यातील मिंडेवाडी या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या ...
वासुली आणि शिंदे गाव ही एमआयडीसीमधील महत्त्वाची गावे आहेत. तसेच मावळ तालुक्यातील मिंडेवाडी या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने अवजड वाहतूक सुरू असते. २००७-०८ च्या दरम्यान आलेल्या डाऊ केमिकल कंपनीसाठी त्यावेळी हा रस्ता दुरुस्त करण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत या रस्त्याची कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी तर चार ते पाच फूट व्यासाचे खड्डे पडले आहेत. याशिवाय रस्ता क्रॉस करताना अनेक ठिकाणी केबल आणि पाइपलाइनसाठी रस्ता खोदला असल्याने खड्ड्यात आणखी भर पडली आहे.
या मार्गावरील खड्डे डांबराने भरण्यात आले होते, मात्र कामाचा दर्जा चांगला नसल्याने हे खड्डे काही महिन्यांमध्ये उखडले आहेत. खड्डे उखडल्याने खडी रस्त्यावर आली आहे. यामुळे दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. दुचाकी खराब होणे, खड्यांवरून घसरून अपघात होणे, अवजड वाहनांच्या टायरखाली दगड आल्यावर ते वेगाने उडून रस्त्याशेजारील व्यक्तींना लागणे, असे प्रकार घडत आहेत. यासाठी लवकरात लवकर या रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरण करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, सुनील देवकर, अमोल पानमंद, दत्तात्रय टेमगिरे, नीलेश पानमंद, अंकुश घनवट यांच्यासह शिंदे ग्रामस्थांनी केली आहे.
२९ आंबेठाण
वासुली फाटा ते मिंडेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर पडलेले खड्डे.