फत्तेमंगल गढीच्या जीर्णोद्धाराची मागणी
By admin | Published: May 5, 2017 02:13 AM2017-05-05T02:13:19+5:302017-05-05T02:13:19+5:30
फत्तेमंगल गढी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूर शहरातील गढीचा जीर्णोद्धार करण्याची मागणी
इंदापूर : फत्तेमंगल गढी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूर शहरातील गढीचा जीर्णोद्धार करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे. अतिशय दुरवस्थेत असणाऱ्या या ऐतिहासिक स्थळाला गतवैभव प्राप्त होणार आहे.
इंदापूर, सुपे, चाकण, बारामती या परगण्यातील महत्त्वाचे ठिकाण म्हणून मालोजीराजे भोसले यांच्या गढीचा मान आहे. निजामशाहीचे सरदार म्हणून मालोजीराजे या गढीतून जहागिरीचा कारभार बघत असत. ते ज्या वेळी मोहिमेवर नसत, त्या वेळी विश्रांतीसाठी त्यांचा या गढीवर मुक्काम असे. या गढीची रचना अतिशय नियोजनबद्ध करण्यात आली होती. गढीला मातीचेच, परंतु अतिशय मजबूत असे आठ बुरूज होते. नजीकच अन्नधान्य साठवणुकीसाठी, शस्त्रसाठा ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
मालोजीराजे हे इंद्रेश्वराचे निस्सीम भक्त होते. सूर्योदयाच्या वेळी सूर्याला नमन करण्यासाठी ते जेव्हा बाहेर येत, त्या वेळी गढीवरून सूर्याबरोबरच इंद्रेश्वराचे दर्शन होईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. गढीबरोबर इंदापूर शहराचेही शत्रूंपासून संरक्षण व्हावे, याकरिता तट बांधण्यात आले होते. या तटाच्या बाहेर हत्ती, घोडे यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून टाक्या बांधल्या होत्या. या टाक्यांत व इंद्रेश्वर मंदिर परिसरात पाण्याची कमतरता भासू नये, असे नियोजन करण्यात आले होते. आजघडीला टाक्यांची पडझड झाली असली, तरी त्याखालच्या खापरी जलवाहिन्या त्या वेळच्या स्थापत्यकौशल्याची चुणूक दाखवतात. सन १६०५मध्ये आदिलशाहीतील सरदार मिआनराजूच्या सैन्याबरोबर झालेल्या युद्धात मालोजीराजे यांनी देह ठेवला. त्यानंतर आजपर्यंतच्या काळात गढीची पडझड होत गेली. तहसील कार्यालय, इंदापूर पोलीस ठाण्याचा कारभार या गढीतून पाहण्यात येऊ लागला. ज्या शहाशरीफबाबांच्या आशीर्वादमुळे मालोजीराजे यांना मुले झाली त्या बाबांचे अनुयायी चाँदशाहवलीबाबांचा या गढीच्या परिसरातील पुरातन दर्गा ही आणखी एक ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी उभी आहे. बाकी गढीचे बुरूज जमीनदोस्त झाले आहेत. मध्यंतरीच्या काळात महसूल यंत्रणेने गढीच्या उत्तरेकडील भागाच्या कोपऱ्याचे यंत्राने सपाटीकरण केले. लोकांना ये-जा करण्यासाठी तेथे रस्ता केला. इतिहासाची वाट मात्र बुजवून टाकली. गढीच्या बुरजांवर व इतर ठिकाणी लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. गढीच्या भोवतीच्या भागात काटेरी झुडपे वाढलेली आहेत.
(प्रतिनिधी)
गढीचे संवर्धन व्हावे, यासाठी एक समिती कार्यरत आहे. या समितीने शिवप्रेमींची एकजूट करून गढीच्या जीर्णोद्धाराकरिता अनेक आंदोलने केली आहेत. गढीसंवर्धनासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला आहे.
त्याला शासन कधी निधी देते व प्रत्यक्ष काम कधी सुरू होते, याचीच लोकांना उत्सुकता आहे. इंद्रेश्वर मंदिरात शिळांवर कोरलेल्या पादुका आहेत. त्या मालोजीराजे यांच्या असल्याचे सांगितले जाते. त्यांची पूजा केली जाते.