इंदापूरमधील विकासकामांसाठी वीस कोटींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:10 AM2021-01-15T04:10:40+5:302021-01-15T04:10:40+5:30
इंदापूर : इंदापूर नगरपालिकेच्या हद्दीत विकासकामे करण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून विविध कामांकरिता एकूण वीस कोटी ३० ...
इंदापूर : इंदापूर नगरपालिकेच्या हद्दीत विकासकामे करण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून विविध कामांकरिता एकूण वीस कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहर अध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी केली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी ही मागणी करण्यात आली. यावेळी इंदापूर नगर परिषदेचे नगरसेवक अनिकेत वाघ, पोपट शिंदे, स्वप्निल राऊत, अमर गाडे, प्रशांत शिताप, नगरसेविका मधुरा ढवळे, हेमलता माळुंजकर, उषा स्वामी उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्याबरोबरच शहरातील नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवून, विधानसभेला मला आशीर्वाद दिला, त्यामुळेच मी राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो. येणाऱ्या काळात इंदापूरचा विकासात्मक चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर बाळासाहेब ढवळे यांनी केलेली मागणी नागरिकांच्या हिताची असल्याचे ते म्हणाले.
इंदापूर शहरासाठी गॅस-विद्युतदायिनीसाठी - ८० लक्ष रुपये, दलितोत्तर योजनेला - १ कोटी रुपये, नगरोत्थान विकासकामांसाठी - ८ कोटी ५० लक्ष रुपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलितवस्ती सुधार योजनेसाठी - १० कोटी असा एकूण २० कोटी ३० लक्ष रुपयांच्या विकास निधीची मागणी केली आहे.
इंदापूर शहराला गॅसदायिनीची नितांत गरज
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर काम करत असताना, कोरोनाच्य काळात एकाच दिवसात जेव्हा चार -पाच रुग्ण दगावत होते. त्यावेळी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीत नगरपालिका कर्मचारी यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यामुळे भविष्यात अशी अडचण होऊ नये म्हणून इंदापूर शहराला गॅसदायनीची नितांत गरज आहे. त्यामुळे प्रथम ते काम मार्गी लावावे, अशी मागणी शहाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी केली आहे.
१४ इंदापूर
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देताना नगरसेवक