लोकशाहीविरोधी मोदी सरकार हटवा, साहित्यिक, विचारवंतांचे जनतेला आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 06:48 PM2018-04-18T18:48:27+5:302018-04-18T19:19:46+5:30
उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर सरकारकडून आरोपींना पाठीशी घातले जात आहे. नोटाबंदीमुळे झालेले नुकसान, अखलाकची हत्या अशा घटना संविधानाला आणि लोकशाहीला मारक आहेत, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पुणे : धर्मनिरपेक्ष देश असे बिरुद मिरवणा-या भारतात गेल्या काही वर्षांमध्ये संविधानाला आणि लोकशाहीला मारक अशा घटना घडत आहेत. देशाची मूल्यव्यवस्था धोक्यात आली आहे. अखलाकची हत्या असो, की कठुआतील सामूहिक बलात्कार, अशा उद्विग्न घटनांनी नागरिक व्यथित झाले आहेत. समाजात जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण केली जात आहे. जबाबदार नागरिक म्हणून लोकशाही आणि संविधानातील मूल्यव्यवस्था टिकवून ठेवायची असेल, तर लोकशाही-विरोधी मोदी सरकारला सत्तेवरुन पायउतार करा, असे आवाहन राज्यातील विचारवंत, साहित्यिकांतर्फे जनतेला करण्यात आले आहे.
या साहित्यकांमध्ये कुमार सप्तर्षी, अन्वर राजन, किशोर बेडकीहाळ, प्रज्ञा दया पवार, तुषार गांधी, लोकेश शेवडे, विजय दिवाण, यांसारख्या साहित्यिक, विचारवंतांचा समावेश असून त्यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
लोकशाही ज्या संस्थांच्या पायावर उभी असते, त्यांचे अवमूल्यन, सरकार-पुरस्कृत धर्मांधता आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच यामुळे भारतीय नागरिक व्यथित आहेत. मागील चार वर्षात धक्कादायक घटना घडत आहेत. २०१५ मध्ये उत्तर प्रदेशमधील दादरी येथे अखलाक नावाच्या एका मुस्लिमाचा गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन खून झाला. गोरक्षक म्हणविणा-यांनी देशात धुडगूस घातला. व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी सुरु झाली. उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर सरकारकडून आरोपींना पाठीशी घातले जात आहे. नोटाबंदीमुळे झालेले नुकसान, विरोधकांवर हीन पातळीवर उतरुन केली जाणारी टिका, या सर्व घटना उद्विग्न करणा-या आहेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय लोकशाही टिकून रहावी, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, सामाजिक न्याय या मूल्यांवर भारत टिकून रहावा आणि संविधानाला धक्का पोहोचू नये, असे वाटत असेलत तर देशातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकशाहीनिष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन लोकशाही-विरोधी सरकार गेलेच पाहिजे, अशी ठाम भूमिका आता घ्यायला हवी, असे आवाहन पत्रकाद्वारे जनतेला करण्यात आले आहे.
प्रज्ञा दया पवार, कुमार सप्तर्षी, राज कुलकर्णी, लोकेश शेवडे, तुषार गांधी, डॉ. राम पुनियानी, डॉ. विवेक कोरडे, सुनील वालावलकर, विजय दिवाण, राजन अन्वर, आशुतोष शिर्के, डॉ. दिलीप खताळे, किशोर बेडकीहाळ, सुरेश भुसारी, भारती शर्मा आणि डॉ. मंदार काळे या सर्वांनी मिळून हे पत्रक प्रसिद्ध केलं आहे.
-----------
सध्याचे सरकार संविधानाच्या मूल्यांशी विसंगत वर्तन करत आहे. लोकशाहीला आणि संविधानाला मारक परिस्थिती निर्माण झाली आहे. मूल्यांना सुरुंग लावला जात आहे. यामुळे देशाचे दीर्घकालीन नुकसान होत आहे.आजकाल लोक व्यवस्थेच्या विरोधात बोलायलाही घाबरतात. साहित्यिकांनी यापूर्वी पुरस्कार वापसीतून निषेध नोंदवला. चिंताजनक वातावरण तयार होत असताना आता सर्वांनी एकत्र येऊन बोलण्याची, हे अध:पतन रोखण्याची गरज आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून साहित्यिक, विचारवंतांमध्ये याबाबर चर्चा सुरु होती. सर्वसंमतीने, डॉ. विवेक कोरडे यांच्या पुढाकाराने जनतेला पत्रकातून आवाहन करण्यात आले आहे.
- अन्वर राजन