श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टची मागणी; आता तरी मंदिरे खुली करण्यास परवानगी द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:07 PM2021-08-03T14:07:11+5:302021-08-03T14:19:57+5:30
राज्यात दुकाने आणि हॉटेल्स सुरु करण्याासाठी परवानगी मिळत असेल तर मग मंदिरांबाबत दुजाभाव का केला जात आहे
पुणे : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्याबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. चौदा जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये निर्बंध तसेच ठेवण्यात आले आहेत. पुण्यात मात्र अजिबात शिथिलता देण्यात आली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या पाठोपाठ अध्यात्मिक वर्तुळात मंदिरे उघडण्याबाबत मागणी केली जात आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टने सकाळी ६ ते ११ यावेळेत मंदिर खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सरकारकडे केली आहे.
राज्यात दुकाने आणि हॉटेल्स सुरु करण्याासाठी परवानगी मिळत असेल तर मग मंदिरांबाबत दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे.
सूर्यवंशी म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर गेली दीड वर्षे बंद आहेत. दुसऱ्या लाटेच्या अगोदर चार महिने मंदिरांना उदघडण्यास परवानगी देण्यात आली होती. पण त्यानंतर पूर्णपणे बंद करण्यात आली. दुसऱ्या लाटेमुळे मंदिरांनी कुठल्याही प्रकारची मागणी केली नाही. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. पण त्यामध्ये कुठेही मंदिरांचं उल्लेख केलेला नाही. देवदर्शनाने माणसाचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. मनाला उभारीही येते. सकाळच्या वेळेत परवानगी दिली तर आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळून मंदिर उघडू.
लग्न सोहळे मर्यादित लोकांमध्ये होत आहेत. पण त्याच जोडप्यांना देवदर्शनासाठी मंदिरात जाता येत नाही. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली तर आम्ही पुन्हा मंदिरे बंद करू. पण सध्या तरी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन मंदीर खुली करण्यास परवानगी द्यावी. अशी विनंती ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.
सगळे खुल झाले, मग मंदिर बंद नकोत, आचार्य तुषार भोसलेची मागणी
सगळे खुले केले मग मंदिर का बंद, अशी विचारणा करत मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. आता सगळे काही सुरू झालेले असताना, मंदिरे उघडण्याचा निर्णय देतीख सरकारने घ्यावा. हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू होतोय. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिर खुली करा आणि भाविकांना दर्शन घेऊ द्या, सगळे खुल झाले, मग मंदिर बंद नकोत, अशी आग्रही मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.