खानवडीतील मुलींच्या आदर्श शाळेसाठी जागेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:11 AM2021-09-13T04:11:27+5:302021-09-13T04:11:27+5:30
खानवडी येथे मुलींसाठी निवासी व्यवस्था असलेली आदर्श शाळा प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याचा विकास आराखडा तयार केला जाणार असून, ...
खानवडी येथे मुलींसाठी निवासी व्यवस्था असलेली आदर्श शाळा प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याचा विकास आराखडा तयार केला जाणार असून, त्यासाठी तीन एकर जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे खानवडी येथे सरकारी गायरान गट नं. ४३ मध्ये २८ हेक्टर ७८ आर क्षेत्र आहे. त्यातील तीन एकर जागा मिळावी, असा ठराव खानवडी ग्रामपंचायतीच्या १७ ऑगस्ट रोजी झालेल्या मासिक सभेत पारित केला आहे. पुरंदर पंचायत समितीमार्फत हा ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार गायरान जमिनीच्या एकूण क्षेत्रफळापैकी ५ टक्के क्षेत्र शाळा, पाणीपुरवठा, दूरसंचार, दवाखाने, ऊर्जा पुरवठा, केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सार्वजनिक सुविधा व उपक्रमासाठी देता येते. त्यानुसार आदर्श शाळा उभारण्यासाठी तीन एकर जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.