उकाडा वाढाल्याने रसाळ फळांची मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:11 AM2021-01-25T04:11:46+5:302021-01-25T04:11:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि.२४) लिंबू, कलिंगड, खरबूज, पपई, बोरे आणि चिक्कूच्या दरात वाढ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि.२४) लिंबू, कलिंगड, खरबूज, पपई, बोरे आणि चिक्कूच्या दरात वाढ झाली असून, अननस, डाळींब, संत्रा, मोसंबी, स्ट्रॉबेरी, पेरू आणि द्राक्षांचे दर स्थिर होते. कोणत्याही प्रकारच्या फळांमध्ये घट झाली नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
रविवारी मार्केट यार्डात फळबाजारात केरळ येथून अननस ६ ट्रक, मोसंबी २५ ते ३० टन, संत्री १५ ते २० टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, पेरू ६०० के्रट, चिक्कू १ हजार गोणी, खरबुजाची १० ते १५ टेम्पो, बोरे १५० ते २०० गोणी, स्ट्रॉबेरी १० ते १५ टन, द्राक्षे २० ते २५ टन इतकी आवक झाली.
फळांचे दर पुढीलप्रमाणे - लिंबे (प्रति गोणी) : ३००-६५०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : जुना (३ डझन) : ३२०-६००, (४ डझन) : १३०-२००, मोसंबी नवीन (३ डझन) : २३०-३६०, (४ डझन) : १००-१८०,संत्रा : (१० किलो) : २००-६००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ५०-२५०, गणेश : २०-८०, आरक्ता ३०-१००. खरबूज : १५-२२, पपई : ५-१२, चिक्कू (१० किलो) १००-७००,
पेरू (२० किलो): ३५०-६००, बोरे (१० किलो) चमेली : २००-३००, उमराण : ८०-१५०, चेकनट : ९००-१०००, चण्यामण्या ३५०-५००, स्ट्रॉबेरी (दोन किलो) ८०-२५०़
---
चिक्कूला मिळाला प्रतिकिलोस ८० रुपयांचा भाव
मार्केटयार्डात घाऊक बाजारात मंचर येथील चिक्कूला तब्बल प्रतिकिलोस ८० रुपये भाव मिळाल्याची माहिती व्यापारी राहुल संगेकार यांनी दिली.
मार्केट यार्डातील व्यापारी पंढरीनाथ बिरादार यांच्या गाळ्यावर मंचर येथील शेतकरी दत्तात्रय शंकरराव बाणखेले यांच्या शेतातील चिक्कूची ८९ डागांची आवक झाली. प्रत्येक डागामध्ये १२ ते १५ किलो चिक्कू होते. त्यातील १३ डागांना ८० रुपये प्रतिकिलोप्रमाणे भाव मिळाला असून, एका डागास १२०० रुपये मिळाले, तर १९ डागांना ५० रुपये प्रतिकिलोप्रमाणे भाव मिळाल्याची माहिती संगेकार यांनी दिली.
--
फुलांचे दर पडले
मार्केट यार्डातील फुलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची साधारण आवक होत आहे. मागणीअभावी गेल्या आठवड्याच्या तुलनेत सर्व प्रकारच्या फुलांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा परिणाम गुलछडी आणि लिलीच्या उत्पादनावर झाला आहे. थंडीमुळे या फुलांची आवक घटली आहे. येत्या मंगळवारी (दि. २६) प्रजासत्ताक दिनामुळे फुलबाजारास सुट्टी आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस फुलांची आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.