बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी, अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा बैलगाडा मालकांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 01:16 PM2018-03-26T13:16:46+5:302018-03-26T13:16:46+5:30
बैलगाडा शर्यतींवरील बंदीमुळे अक्षरशः छोट्या मोठ्या व्यवसायिकांसह गावोगावच्या यात्रांवर मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडला आहे.
हनुमंत देवकर/चाकण : यात्रा व जत्रांच्या पार्श्वभूमीवर शासनाने बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात, अन्यथा रास्ता रोकोसह जन आंदोलन करण्याचा इशारा चाकण परिसरातील बैलगाडा मालकांनी दिला आहे. बैलगाडा शर्यतींवरील बंदीमुळे अक्षरशः छोट्या मोठ्या व्यवसायिकांसह गावोगावच्या यात्रांवर मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडला आहे. बैलगाडा शर्यती हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा, गाडा शौकिनांचा आवडता छंद आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून राज्य शासनाने गाड्यांच्या शर्यतीवर बंदी आणून गाडामालक व शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. न्यायालयानेही या शर्यतींवर बंदी घातली.
मात्र त्याबाबत लढा देऊनही अद्याप शर्यती सुरु करण्यासाठी यश मिळाले नाही. बैल हा उत्तम शेती करून शेतकऱ्यांचा उदर निर्वाह चालवतो. शेतकरी बैलांची जीवापाड काळजी घेतो. बैलपोळा या सणाला बैलांना सजवून गावातून वाद्याच्या गजरात मिरवणूक काढतो. मात्र बैलगाडा शर्यतीवर का बंदी आणली जाते या बाबत अजूनही शेतकरी संभ्रमात आहे. ऐन यात्रा काळात बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असताना सरकार मात्र त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गाडामालक व शेतकऱ्यांनी केला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी त्वरित उठवून गाडा मालकांच्या भावनांचा विचार करून पुन्हा शर्यती सुरू कराव्यात अशी मागणी बैलगाडा मालक संतोषशेठ भोसले, जीवन खराबी, सुनील बिरदवडे, शशिकांत कड, राजेंद्र पडवळ, मारुती खराबी, अशोक खराबी, रामदास कड, बाळासाहेब खराबी, राजेंद्र खराबी, नवनाथ शेवकरी, महेश शेवकरी, अशोक बिरदवडे, बाळासाहेब सोपानराव कड, श्रीपती खराबी, बाळासाहेब जाधव, नारायणशेठ जावळे, पप्पू फलके, सुनील फलके, मोहन भांगरे, चंद्रभान पवार, संदीप बाबुराव जाधव, बाळासाहेब नाणेकर, सुनील जाधव, बजरंग कड, संतोष मुळे, संतोष मांडेकर, ज्ञानोबा दवणे, बाळासाहेब पठारे, काका आगरकर, संपतराव येळवंडे, अंकुश येळवंडे, विलासराव येळवंडे, कोंडीभाऊ येळवंडे, भगवान बिरदवडे आदींसह बैलगाडा शौकिनांनी केली आहे.
बैलगाडा शर्यतीविना गाव जत्रा पडल्या ओस
सध्या गावागावांत यात्रा जत्रांचा हंगाम सुरु असून बैलगाडा शर्यती वर बंदी असल्याने गावोगावच्या यात्रा ओस पडल्या आहेत. गावच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यतीला अनन्य साधारण महत्व आहे. गावच्या यात्रांमधून ग्रामीण भागातील खेड्यांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते, मात्र शर्यती बंद पडल्याने गाडा शौकिनांनी, पाहुणे मंडळींनी यात्रांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गाव यात्रांमध्ये होणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडला आहे. यात्रांमधून तळागाळातील छोटे छोटे व्यावसायिक गावोगावी भटकंती करून आपला उदरनिर्वाह चालवितात.
प्रत्येक गावात यात्रा कालावधीत गावामध्ये भेळवाले, कलिंगड विक्रेते, आईस कँडी, पाणी पुरी, पाळणावाले, पानमसाला, टेम्पोवाले, हलगीवाले, वाजंत्री, लाऊड स्पीकर, निवेदक, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने, रसवंती, आईस्क्रीम, किराणा दुकानदार, स्वीट सेंटर्स, कापड दुकानदार, विद्युत रोषणाई आदी व्यावसायिक गावागावातील यात्रांवर अवलंबून व्यवसाय करीत असतात. मात्र बैलगाडा शर्यती बंदीमुळे यात्राही ओस पडू लागल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर झाला आहे.