मकर संक्रांतीच्या भोगीच्या भाज्यांची वाढली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:43 PM2020-01-13T13:43:21+5:302020-01-13T13:48:41+5:30
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक हंगाम व त्या हंगामामध्ये येणाऱ्या खाद्यपदार्थ यांची संगड घालून सण साजरे केले जातात.
पुणे : मकर संक्रांतीच्या सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंपरेनुसार मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी या हंगामात येणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून भोगीची भाजी केली जाते. मंगळवार (दि.१४) रोजी साजऱ्या होणाऱ्या भोगीसाठी रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात मोठ्या प्रमाणात भोगीच्या भाज्यांची आवक झाली होती. आवक जास्त असली तरी मागणी वाढल्याने पावडा, वाटाणा, वांगी आदी भाज्याच्या दरामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढली. तर अन्य भाज्यांचे दर मात्र स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक हंगाम व त्या हंगामामध्ये येणाऱ्या खाद्यपदार्थ यांची संगड घालून सण साजरे केले जातात. याचा एक भाग म्हणून संक्रांती निमित्त बहुतेक घरांमध्ये भोगीचा सण साजरा केला जातो. यादिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी आणि हरभरा, वाटाणा, वांगी, शेंगदाणे, कांद्याची पात, गाजर, पावटा सर्व भाज्या एकत्र करुन भाजी केली जाते. यामुळे रविवारी मार्केट मध्ये या भाज्यांची मोठी आवक झाली होती. मार्केटयार्डात रविवारी कांदा, आले, टोमॅटो, काकडी, शिमला मिरची, शेवगा, गाजर आणि घेवड्याच्या दरामध्ये घट झाली. तर बटाटा, भेंडी आणि पावटा, वाटाणाच्या दरामध्ये वाढ झाली. अन्य सर्व फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
गुलेटकीड येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील तरकरी विभागात रविवारी (दि.१२) सुमारे १६० ते १७० ट्रक शेतमालाची आवक झाली. यामध्ये स्थानिक मालासह परराज्यातील शेतमालाचा समावेश आहे. परराज्यातून आलेल्या मालामध्ये आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यांतुन सुमारे १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात येथुन ३ ते ४ ट्रक कोबी, आंध्रप्रदेशातून शेवगा सुमारे ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, राजस्थानातून १६ ते १७ ट्रक गाजर, गुजरात मधून भुईमुग शेंग १०० पोती, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, आग्रा आणि इंदौर येथुन मिळून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले १ हजार ते १२०० पोती, टॉमेटो सहा हजार पेटी, काकडी १० ते १२ टेम्पो, वांगी १० ते १२ टेम्पो, भेंडी १० ते १२ टेम्पो, गवार ८ ते १० टेम्पो, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी ७ ते ८ टेम्पो, भुईमूग ५० ते ६० पोती, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळाची १४ ते १५ टेम्पो, कांदा २०० ट्रक इतकी आवक झाली.
--
कोथिंबिरीच्या दोन लाख जुड्यांची आवक
मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात रविवारी पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. कोथींबीरीची दोन लाख जुडी तर मेथीची एक लाख जुड्यांची आवक झाली. रविवारी ग्राहकांनी पालेभाज्या खरेदीसाठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.