वेल्हे तालुक्यातील ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण; विंझर ते कात्रज पीएमपीएलच्या बससेवेस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 08:01 PM2021-06-20T20:01:13+5:302021-06-20T20:01:24+5:30
एसटीची सेवा अपुरी पडत असल्याने पीएमपीएलची बससेवा केली चालू
मार्गासनी: वेल्हे तालुक्यात विद्यार्थी आणि कामगारांना गेली अनेक वर्षे एसटी सेवा देत होती. परंतु दिवसेदिवस एसटीची सेवा अपुरी पडत चालली असल्याने पीएमपीएलची बससेवा चालू करावी. अशी ग्रामस्थांची मागणी होती. अखेर या मागणीला यश आले असून आजपासून बससेवा सुरु करण्यात आली आहे.
याचे उद्धाटन भोर वेल्हे मुळशी चे आमदार संग्राम थोपटे व पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका राणी भोसले माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमपीएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
वेल्हे तालुका हा निसर्गाने नटलेला आहे. किल्ले राजगड, तोरणा, मढेघाट या परिसरात पर्यटनासाठी पर्यटक येत असतात. तसेच पुणे शहरापासुन ५० किलोमीटर अंतर असल्याने दररोज विद्यार्थी व कामगार प्रवास करत आहेत. पुणे शहरात वास्तव्य असलेले वेल्हे तालुक्यातील ग्रामस्थ वेळोवेळी प्रयत्न करीत होते. वेल्हे तालुक्यातील विंझर ते कात्रज पीएमपीएलच्या बससेवेस नुकतीस सुरुवात करण्यात आली.