हनीट्रॅपमध्ये अडकवून केली खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:15 AM2021-09-17T04:15:35+5:302021-09-17T04:15:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील एका भाजी विक्रेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून यूट्युब न्यूज चॅनेल व संघटनेच्या नावाखाली ब्लॅक मेल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील एका भाजी विक्रेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून यूट्युब न्यूज चॅनेल व संघटनेच्या नावाखाली ब्लॅक मेल करणाऱ्यास हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी जेजुरी येथे राहणाऱ्या एका ३८ वर्षांच्या भाजी विक्रेत्याने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवप्रहार संघटनेच्या अनिल जगन्नाथ बोटे (वय ३४, रा. तुकाई टेकडी, हडपसर) याला अटक केली आहे. तर महाराष्ट्राच्या प्रहार न्यूजच्या राहुल हरपळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी दोघांचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून त्याच्याकडे सीबीआय अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्रही सापडल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या ओळखीच्या स्वप्निल धोत्रे याचा त्यांना १० सप्टेंबर रोजी फोन आला. त्याने पबला बोलवले होते. त्याच्यासोबत राहुल हरपळे व दोन मुलींना घेऊन ते कोरेगाव पार्क येथील एका पबमध्ये गेले. तेथे अनिल बोटे हा अगोदरच आला होता. पबमध्ये फिर्यादीशी त्यातील एका मुलीने जवळीक केली. त्यानंतर तेथून सर्व जण निघाले. फिर्यादी व त्याच्याबरोबर असलेल्या मुलीने घरी जाताना रस्त्यात पावभाजी खाल्ली. त्यानंतर हे दोघेच एका लॉजवर गेले. तेथे त्यांच्यात शरीरसंबंध झाला.
त्यानंतर दोन दिवसांनी राहुल हरपळे, अनिल बोटे, स्वप्निल धोत्रे व एक मुलगी फिर्यादीच्या भाजीच्या दुकानावर आले. अनिल बोटे याने तू संबंधित मुलीवर बलात्कार केला आहे. आम्ही तुझ्याविरुद्ध पोलिसाकडे तक्रार देणार आहोत. जर तक्रार करायची नसेल तर ५ लाख रुपये आणून दे, अशी मागणी केली. त्यानंतर दुस-या दिवशी फिर्यादी अनिल बोटे याला समजाविण्यासाठी राहुल हरपळे याच्या हडपसर मेगा सेंटर येथील कार्यालयात गेले होते. तेव्हा पैसे न आणल्याने बोटे याने फिर्यादीला शिवीगाळ करीत त्यांच्या डोक्यात खुर्ची उचलून मारली. तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो व माझ्या संघटनेची काय ताकद आहे, हे दाखवितो, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून फिर्यादी घरी आले. त्यानंतर स्वप्निल धोत्रे याचा फोन करून सांगितले की, अनिल बोटे तुझ्याविरुद्ध तक्रार करायला लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेला आहे. हे समजल्यावर फिर्यादी हे स्वत: लोणी काळभोर पोलिसांकडे केले. हा प्रकार हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे लोणी काळभोर पोलिसांनी हा गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला आहे.