मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडे ३ कोटींची खंडणी मागणारे अटकेत
By विवेक भुसे | Published: March 27, 2023 03:45 PM2023-03-27T15:45:44+5:302023-03-27T15:45:53+5:30
पोलिसांनी सापळा रचून इंटरनेट आणि सीसीटीव्हीच्या मदतीने शक्कल लढवून दोघांना पकडले
पुणे: भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा करण्यात आला असून गुन्हे शाखेने खंडणी घेण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. संदीप पिरगोंडा पाटील (वय ३३, रा. बेकनार, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) आणि शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रोड) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ मार्च रोजी दुपारी १२ ते सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान घडला.
या प्रकरणी आरोपी पाटील,ताकवणे यांच्या विरुद्ध खंडणी, धमकावणे, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पौड रस्त्यावर फिर्यादी बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी पाटील, ताकवणे यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, त्यांच्या मावसभावाचा नावाचा वापर करुन त्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ३ कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहचवू, अशी धमकी पाटील आणि ताकवणे यांनी दिली.
असा लागला तपास
बांधकाम व्यावसायिक मोहोळ यांचे मित्र असल्याने त्यांना संशय आला. मुरलीधर मोहोळ यांनी तात्काळ याची माहिती सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिली. पोलिसांच्या सूचनेनुसार फिर्यादी यांनी १० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार शेखर ताकावणे हा फिर्यादीच्या कार्यालयात गेला. पोलिसांनी त्याला पैसे घेताना पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर मुख्य खंडणी मागणाऱ्याने पैसे घेऊन स्वारगेट चौकात येण्यास कळविले. त्याप्रमाणे दुसरा सापळा स्वारगेट चौकात लावण्यात आला. पण तो सारखा ठिकाण बदलत होता. नंतर त्याने कात्रज जुना बोगदा येथे पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर तो पोलिसांची चाहुल लागताच कारसह पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले.
त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने इंटरनेटद्वारे मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्यांचा (स्पुफिंग कॉल सायबर क्राईम) वापर करुन त्यांच्याच बांधकाम व्यावसायिक मित्राकडून खंडणी मागण्याचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर, पोलीस अंमलदार शरद वाकसे, संजीव कळेंबे, प्रताप पडवाळ, प्रकाश कट्टे, ज्ञानेश्वर चित्ते, विकास चौगुले, सावंत यांनी केली.