Pune: अवकाळीग्रस्तांना भरपाईची मागणी; ५७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By नितीन चौधरी | Published: May 24, 2023 04:53 PM2023-05-24T16:53:24+5:302023-05-24T16:53:43+5:30
या पावसामुळे आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक २०६ हेक्टरचे नुकसान झाले होते तर जिल्ह्यातील १९३ गावांमधील २ हजार ५५ शेतकऱ्यांना फटका बसला...
पुणे : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे एप्रिलमध्ये सुमारे ५७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यातून ही आकडेवारी स्पष्ट झाली असून या नुकसानीपोटी भरपाई म्हणून १ कोटी रुपयांची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. या पावसामुळे आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक २०६ हेक्टरचे नुकसान झाले होते तर जिल्ह्यातील १९३ गावांमधील २ हजार ५५ शेतकऱ्यांना फटका बसला.
राज्यात एप्रिलमध्ये बहुतांश जिल्ह्यांत अवकाळीचा कहर झाला होता. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यासाठी कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात ५७०.०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे या पंचनाम्यांमधून स्पष्ट झाले आहे. त्या सर्वाधिक २०६.१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान आंबेगाव तालुक्यात तर सर्वात कमी १.४३. हेक्टरवरील शेतीचे नुकसान पुरंदर तालुक्यात झाले आहे. या अवकाळीचा फटका आंबेगाव तालुक्यातील ८४५ शेतकऱ्यांना बसला आहे. तर सबंध जिल्ह्यात २ हजार ५५ शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. या पावसामुळे जिल्ह्यातील १९३ गावांमधील शेतीचे नुकसान झाले आहे.
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान हे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे अशा शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाई दिली जाणार आहे. यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी या नुकसानीपोटी सुमारे १ कोटी १ लाख रुपयांच्या भरपाईची मागणी करण्यात आली आहे. याच अहवालानुसार शेतजमिनीचे नुकसान झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
११ महिन्यांत ४० हजार हेक्टरला फटला
नैसर्गिक आपत्तीमुळे जून २०२२ ते एप्रिल २०२३ या काळात जिल्ह्यात तब्बल ४० हजार ४३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीपोटी ७८ कोटी ४८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ७७ कोटी ४७ लाख रुपयांची मदत वाटप करण्यात आली असल्याचेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले. या वर्षभरात १ हजार ४०७ गावांमधील ९८ हजार ७१ शेतकऱ्यांना फटका बसला.
तालुकानिहाय नुकसान (एप्रिल)
तालुका गावे शेतकरी क्षेत्र (हे.)
शिरूर २ ६ १.४८
खेड २० ३०१ ९१.२३
आंबेगाव १९ ८५४ २०६.१२
इंदापूर १८ ११६ ३१.४६
दौंड १ १४ ४
भोर ४० १६५ ४०.८७
मुळशी १५ १३८ ६१.९१
वेल्हा २१ ५० ८.०५
मावळ ३४ १८४ ७४.४३
हवेली २० २३२ ४८.१५
पुरंदर ३ ४ १.४३
एकूण १९३ २०५५ ५७०.०१