दिब्रिटो यांच्या पुण्यातील सत्कार सोहळयाप्रसंगी पोलिस बंदोबस्ताची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 03:28 PM2019-09-25T15:28:07+5:302019-09-25T15:36:11+5:30

फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्षपदी नाव जाहीर झाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या नावाला विरोध केला.

demands of Police protection in the Pune Reception Ceremony of Debitrito | दिब्रिटो यांच्या पुण्यातील सत्कार सोहळयाप्रसंगी पोलिस बंदोबस्ताची मागणी

दिब्रिटो यांच्या पुण्यातील सत्कार सोहळयाप्रसंगी पोलिस बंदोबस्ताची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देउस्मानाबाद येथे यंदाचे संमेलन १० ते १२ जानेवारी दरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा मसापच्या वतीने सत्कार

पुणे : उस्मानाबाद येथे होत असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची सन्मानाने निवड करण्यात आली आहे. मात्र, काही संस्थांकडून त्यांच्या निवडीला विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये होत असलेल्या दिब्रिटो यांच्या सन्मान सोहळयाला पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
साहित्य महामंडळाने गेल्या वर्षीपासून साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याऐवजी सन्मानाने निवड व्हावी, असा ऐतिहासिक निर्णय घेतला. यंदाचे संमेलन १० ते १२ जानेवारी दरम्यान उस्मानाबाद येथे होत आहे. २२ सप्टेंबर रोजी झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. संमेलनाध्यक्षपदी त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर काही हिंदुतत्वावदी संघटनांनी त्यांच्या नावाला विरोध केला. उस्मानाबाद येथील संमेलन उधळून लावू, दिब्रिटो यांनी स्वत:हून अध्यक्षपद नाकारावे, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया मंगळवारपासून उमटू लागल्या.


नवनिर्वाचित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गुरुवारी, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६. १५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. 
सध्या समाजमाध्यमांमधून काही व्यक्ती द्वेषमूलक मजकूर आणि प्रतिक्रिया प्रसिध्द करत आहेत. सत्कारप्रसंगी अशा व्यक्ती निदर्शने किंवा कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्याची शक्यता वाटते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी ५.३० वाजल्यापासून साध्या वेशातील काही पोलीस मसापच्या परिसरात बंदोबस्तासाठी किंवा देखरेखीसाठी पाठवावेत, असे पत्र महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पोलीस आयुक्तांना लिहिण्यात आले आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

Web Title: demands of Police protection in the Pune Reception Ceremony of Debitrito

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.