परिवर्तनवाद्यांना मागे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याने लोकशाही धोक्यात- जावेद अख्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 08:02 PM2017-08-20T20:02:43+5:302017-08-20T20:02:56+5:30
‘देश परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मात्र, परिवर्तनवाद्यांना मागे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे.
पुणे, दि. 20 - ‘देश परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मात्र, परिवर्तनवाद्यांना मागे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. काही लोकांनी स्वत:चाच हेका कायम ठेवला आहे. इतरांचे चूक आणि आपले बरोबर, अशी धारणा असेल तर लोकशाही टिकू शकत नाही. हवेत विष पेरले की ते प्रत्येक श्वासात भिनते. त्याचप्रमाणे समाजात वाईट संस्कार पेरले जात आहेत. बोलण्यावर, विचारांवर, अभिव्यक्तीवर बंधने घातली जात आहेत. धर्माच्या आडून सत्ता राबवू पाहणा-यांनी प्रश्न विचारण्याचा हक्क हिरावून घेतला आहे’, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी, लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी सद्यस्थितीवर निशाणा साधला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निषेध जागराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अख्तर बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, शैला दाभोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. ‘आमचा आवाज, हाच देशाचा आवाज आहे, असे कोणी म्हणू लागले तर आपण सावध व्हायला हवे. पाप, पुण्याच्या हिशेबात न अडकता प्रबोधनाची कास धरायला हवी’, असे सूतोवाचही त्यांनी केले.