पीएमपी कर्मचा-यांचा प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:45 AM2018-01-17T05:45:19+5:302018-01-17T05:45:39+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचा-यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र कामगार मंचाच्या वतीने प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचा-यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र कामगार मंचाच्या वतीने प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी संघटनेचे सदस्य असलेल्या कामगारांकडून पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांचाही निषेध केला जाणार आहे. मंचाचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी याबाबत प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी कर्मचाºयांवर सातत्याने अन्यायकारक कारवाई होत असल्याचे नमूद केले आहे.
पीएमपी प्रशासनाचा कर्मचा-यांवर मानसिक दबाव
मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत पीएमपी प्रशासनाने महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांच्यावर मानसिक दबाव टाकून, दहशत निर्माण करून, मनमानी व बेकायदेशीर कामकाज करून, कर्मचाºयांचे शोषण केले आहे. याचा परिणाम ‘पीएमपी’तील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला आहे. या कारणास्तव आम्ही खरोखरच स्वतंत्र देशामध्ये वास्तव्य करीत आहोत की गुलाम आहोत? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या बेकायदेशीर कृत्याचा निषेध म्हणून २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमावर बहिष्कार घातला जाईल, असे मोहिते यांनी स्पष्ट केले.