काँग्रेस भवनाची तोडफोड निंदनीय; पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य : संग्राम थोपटे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 10:07 PM2019-12-31T22:07:00+5:302019-12-31T22:07:24+5:30
24 तास उलटले असताना मंत्रिपद न मिळालेल्या भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नाराज समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली.
पुणे : ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन जेमतेम 24 तास उलटले असताना मंत्रिपद न मिळालेल्या भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नाराज समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली. त्यावर आता थोपटे यांनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकाराची मलाही माहिती नव्हती, पक्षाचा निर्णय मान्य आहे, असे मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, 'भोर-वेल्हा- मुळशी' असा विस्तीर्ण मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात थोपटे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वीही त्यांच्या वडिलांनी याच भागातून राजकीय ठसा उमटवला आहे. त्यामुळे थोपटे गटाला यावेळी मंत्रिपदाची अपेक्षा होती. ती पूर्ण न झाल्याने संतप्त समर्थकांनी काल भोरमध्ये आंदोलन करत घोषणाबाजी केली होती. काँग्रेसचे भोर-वेल्हा विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे याशिवाय भोर नगरपालिकेच्या सर्व 20 नगरसेवकांसह इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचीही घोषणा केली होती. मात्र इतक्यावरच न थांबता मंगळवारी संध्याकाळी 6च्या सुमारास 40 ते 50 कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर भागातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली.
त्यावर आता थोपटे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, 'काल मुंबईला मुक्कामी होतो, आज सकाळी भोरला आलो. संबंधित प्रकाराची मलाही माहिती नव्हती, मलाही टीव्हीद्वारे संध्याकाळी कळले. हा झालेला प्रकार निंदनीय आणि चुकीचा आहे. कोण कार्यकर्ते आहेत, याची मीही माहिती घेतोय. शहर की ग्रामीण भागातील कार्यकर्ते आहेत की इतर पक्षातील कोणी विनाकारण गालबोट लावत आहेत, याचीही शहानिशा सुरू आहे. मला स्वतःला पक्षश्रेष्ठींनी दिलेला निर्णय मान्यच आहे आणि कायम राहील. माझे
कार्यकर्त्यांना आवाहन आहे की त्यांनी शांततेत राहावे, अनुचित प्रकार करू नये' अशी विनंती करतो.