महापालिका सभागृहनेते भिमाले यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 09:11 PM2018-05-28T21:11:45+5:302018-05-28T21:11:45+5:30
महापालिकेच्या २१ मे रोजी झालेल्या सभेत फ्रॉड हा शब्द उच्चारल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
पुणे : महापालिका मुख्यसभेत केलेल्या वक्तव्याबाबत सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या विरोधात काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सोमवारी मानहानी आणि अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सचिन आगरकर यांच्या न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे. भिमाले यांच्याविरोधात शिंदे यांनी २३ मे रोजी पोलिसांत तक्रार दिली आहे. महापालिकेच्या २१ मे रोजी झालेल्या सभेत भिमाले यांनी शिंदे यांना फ्रॉड हा शब्द वापरल्याने त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. लिकेतील अधिकारी किशोर पडळ हे भिमाले यांच्या कार्यालयात वेळेत न आल्याबद्दल त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्या अधिका-याने पाच मे रोजी तक्रारही दाखल केली होती. पुणे महापालिकेच्या अधिका-यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण करणा-यांवर कारवाईची मागणी या सभेत केली होती. या वेळी भिमाले हे चिडले आणि त्यांनी माझ्या बद्दल अपशब्द वापरले. अरविंद शिंदे हा फ्रॉड असून, तो लोकांना ब्लॅकमेल करतो, असे आरोप भिमाले यांनी या सर्वसाधारण सभेत केले होते. नगरसेवक, अधिकारी आणि पत्रकार यांच्यासमोर भिमाले यांनी ही वाक्ये उच्चारली आहेत, असे शिंदे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान याप्रकरणी दिवाणी न्यायालयात २५ कोटी रुपयांचा मानहानी व अब्रुनुकसानीचा स्वतंत्र खटला दाखल करणार असल्याची माहिती शिंदे यांचे वकील अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली. शिंदे यांच्यावतीने अॅड. ठोंबरे, अॅड. जयपाल पाटील यांनी काम पाहिले.