त्रस्त फ्लॅटधारकांचे दिल्लीत निदर्शने, पुण्यातील डीएसके प्रकल्पातील पीडितांचाही समावेश
By नितीन चौधरी | Published: August 19, 2023 06:13 PM2023-08-19T18:13:24+5:302023-08-19T18:13:43+5:30
या समस्यांबाबत लवकर तोडगा न निघाल्यास राजधानीतील सर्व रस्त्यांवर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला....
पुणे : देशभरात फ्लॅटधारकांच्या होत असलेल्या पिळवणुकीबाबत नवी दिल्लीत आज शनिवारी निदर्शने करण्यात आली. फ्लॅटधारकांच्या समस्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ही दखल घ्यावी अशी अपेक्षा या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या समस्यांबाबत लवकर तोडगा न निघाल्यास राजधानीतील सर्व रस्त्यांवर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
या आंदोलनात पुण्यातील डीएसके यांच्या प्रकल्पातील त्रस्त फ्लॅटधारकदेखील सहभागी झाले आहेत. देशभरात अनेक बांधकाम प्रकल्पांमध्ये फ्लॅट धारक नाडले जात आहेत. या विरोधात अनेक न्यायालयांमध्ये प्रकरणे प्रलंबित आहेत. मात्र, त्यावर अजूनही सन्मानजनक तोडगा निघालेला नाही. यासंदर्भातच लक्ष वेधण्यासाठी देशाच्या विविध भागातील समस्याग्रस्त फ्लॅटधारक दिल्लीत जमले आहेत. या सर्वांनी दिल्लीत आपल्या मागण्यांबाबत शनिवारी निदर्शने केली. सर्वोच्च न्यायालयानेदेखील याबाबत हस्तक्षेप करावा, अशी मागणी यावेळी या आंदोलनकर्त्यांनी केली.
वेगवेगळ्या विषयांवर तातडीने सुनावणी घेण्यात येते. मात्र, फ्लॅटधारकांच्या हक्कासाठी मात्र केवळ तारखांवर तारखा दिल्या जात असल्याचा आरोप यावेळी या फ्लॅटधारकांनी केला. या आंदोलनामध्ये पुण्यातील डीएसके यांच्या प्रकल्पातील त्रस्त फॅटधारकही सहभागी झाले आहेत. याविषयी संजय अश्रित म्हणाले, "न्यायालय देखील फ्लॅटधारकांच्या हक्काबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. सरकार देखील यात लक्ष घालत नाही. मात्र, न्यायालयाने फ्लॅटधारकांच्या हक्कांबाबत हस्तक्षेप करावा. फ्लॅटधारकांच्या समस्यांबाबत लक्ष न घातल्यास दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर आंदोलन करण्यात येईल.