पीएमपीच्या महाव्यवस्थापकांची पदावनती
By Admin | Published: April 23, 2017 04:25 AM2017-04-23T04:25:27+5:302017-04-23T04:25:27+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) महाव्यवस्थापक आणि वाहतूक व्यवस्थापक (संचलन) अनंत वाघमारे यांची पदावनती करण्यात आली आहे. ‘पीएमपी’चे अध्यक्ष
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) महाव्यवस्थापक आणि वाहतूक व्यवस्थापक (संचलन) अनंत वाघमारे यांची पदावनती करण्यात आली आहे. ‘पीएमपी’चे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी वाघमारे यांना वर्ग एकच्या पदावरून थेट वर्ग तीनचे ‘क्वालिटी कंट्रोलर’ हे पद दिले आहे. दरम्यान, वाघमारे यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांची मागील काही वर्षांपूर्वी झालेली पदोन्नती बेकायदेशीर असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
‘पीएमपी’ची स्थिती सुधारण्यासाठी मुंढे यांनी चार आठवड्यांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेत कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवरही शिस्तीचा बडगा उगारला आहे. निलंबनाच्या कारवाईसह बदल्यांवर जोर देत त्यांनी वचक निर्माण केला आहे. कामगिरी सुधारत नसल्याने काही दिवसांपूर्वीच त्यांनी भांडारप्रमुखांना बडतर्फ केले.
दरम्यान, महामंडळाच्या आस्थापनेवरील काही पदे शासनाकडून प्रतिनियुक्तीने भरणे आवश्यक असताना पीएमपी प्रशासनाने राज्य शासनाची मान्यता न घेता या पदांवर पीएमपीतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली. त्यामध्ये जाहिरात विभागप्रमुख, स्वच्छता विभागप्रमुख, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), पास विभागप्रमुख, इंग्रजी स्टेनोग्राफर, कॉम्प्युटर स्टेनोग्राफर, मेंंटेनन्स सुपरवायझर, मराठी स्टेनोग्राफर, मुख्य अभियंता, सीनिअर वर्क्स मॅनेजर, काही आगारप्रमुख, टेलिफोन विभागप्रमुख आदी पदांचा समावेश आहे. वाघमारे यांनाही यामध्ये पदोन्नती मिळाली होती.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वीच मुंढे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे वाघमारे यांची मूळ पदावर नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. आता इतर संबंधित अधिकाऱ्यांचीही पदावनती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
(प्रतिनिधी)
रुजू झालेल्या पदावरच करावे लागणार काम
वाघमारे यांची नियुक्ती भांडार विभागात क्वालिटी कंट्रोलरपदावर करण्यात आली आहे. याच पदावर ते पीएमपीमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर त्यांची पदोन्नती झाली होती. आता पुन्हा त्या पदावर काम करावे लागणार आहे.
वाघमारे यांच्या जागी आता सध्याचे वाहतूक व्यवस्थापक (व्यावसायिक) सुनील गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे दोन्ही पदे सोपविण्यात आली आहेत.