चौदा दिवसांत डेंगीचे ८२ रुग्ण
By Admin | Published: November 15, 2015 01:14 AM2015-11-15T01:14:27+5:302015-11-15T01:14:27+5:30
गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात थैमान माजविणाऱ्या डेंगीने यंदाही डोके वर काढले असून, या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत.
पुणे : गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात थैमान माजविणाऱ्या डेंगीने यंदाही डोके वर काढले असून, या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. नोव्हेंबर महिन्यात गेल्या १४ दिवसांमध्ये डेंगीची लागण झालेले तब्बल ८२ नवे रुग्ण सापडले आहेत. यावरून पुणे महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर जुलै ते फेब्रुवारी या ८ महिन्यांच्या कालावधीत शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे गेल्या काही वर्षांतील चित्र आहे. त्यामुळे डेंगीच्या आजारात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून अशी स्थिती आहे. पावसाळ्यानंतर शहरात डेंगीचा उद्रेक होत असून, ती आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे.
यंदा तरी पुण्यात डेंगीची साथ येणार नाही, अशी आशा पुणेकर करीत होते; मात्र पावसाळा संपण्याअगोदरच डेेंगीने शहरात डोके वर काढल्याचे चित्र आहे. जानेवारी ते जून या काळात महिन्याकाठी दहा-अकरा असे असणारे रुग्ण जुलै महिन्यापासून मात्र सातत्याने वाढत आहेत. जुलै महिन्यात डेंगीचे ७५ रुग्ण सापडले. आॅगस्ट महिन्यात त्याची संख्या वाढून ती १५६ वर पोहोचली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात २९० आणि आॅक्टोबरमध्ये तब्बल ३६० रुग्ण सापडले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात अवघ्या १४ दिवसांत डेंगीची लागण झालेले तब्बल ८२ नवे रुग्ण सापडले आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. गेल्या तीन वर्षांपासून डेंगीचा उद्रेक होत असल्याने पालिकेकडून यंदा तरी ठोस उपाययोजना करण्यात येतील, अशी आशा पुणेकर करीत होते. मात्र, रुग्णांची वाढती संख्या पाहून पालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.