डेंगीच्या डासांना ‘जीवदान’ का?
By admin | Published: October 6, 2016 04:08 AM2016-10-06T04:08:24+5:302016-10-06T04:08:24+5:30
शहरातील डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांत होत असलेली वाढ लक्षात घेऊन पुणे महापालिकेतर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत.
पुणे : शहरातील डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांत होत असलेली वाढ लक्षात घेऊन पुणे महापालिकेतर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये डासोत्पत्ती स्थाने सापडणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना दंड ठोठावण्यात येत आहे. मात्र, शहरातील नगरसेवक या दंड आकारणीमध्ये नागरिकांच्या बाजूची भूमिका घेऊन पालिकेच्या कारवाईत खो घालत आहेत. त्यामुळे कारवाईत अडचणी येत असल्याचे शहरात या कारवाईचे काम करणाऱ्या पालिकेतील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
एकीकडे पालिकेतील सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून शहरातील साथीचे आजार रोखण्यासाठी प्रशासनावर जोरदार टीका केली जात असताना दुसरीकडे मात्र पालिकेच्या कारवाईत अडथळा निर्माण केला जात असल्याचे चित्र आहे. नागरिकांनाही आपल्या आजूबाजूच्या परिसरात डास होऊ नयेत यासाठी वारंवार सूचना देण्यात येत आहेत.
नागरिक या सूचनांचे योग्य पद्धतीने पालन करत नसल्याची
ओरड पालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. यावर उपाय म्हणून महापालिकेने कारवाईचा बडगा उचलला असून, नागरिकांना दंडही आकारण्यात येत आहे.
मात्र, अनेक जण दंड
उगारल्याची तक्रार नगरसेवकांकडे करत असून, नगरसेवकांकडून पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर
दंडाची रक्कम मागे घेण्यात यावी, यासाठी दबाव टाकला जात आहे. यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कारवाईमध्ये अडचणी निर्माण
होत आहेत. डेंगी आणि चिकुनगुनियाला कारणीभूत असणाऱ्या या एडिस इजिप्ती या डासाचा प्रादुर्भाव वाढल्याने या आजाराच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
(प्रतिनिधी)
मोठ्या प्रमाणात दंड वसुली
४घरे, घराच्या आजूबाजूची तसेच सोसायटीच्या आजूबाजूची मोकळी जागा याशिवाय शहरात चालू असणाऱ्या बांधकामांच्या ठिकाणी डेंगी आणि चिकुनगुनियाचे डास मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. याठिकाणी असणारे पाणी आणि ओलसरपणा यामुळे डासोत्पत्तीची स्थानेही जास्त प्रमाणात आढळून येत असल्याने ही डासांची पैदास नष्ट करण्याचे काम करणाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यामध्ये शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश असून, त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात दंडवसुली चालू आहे.
४बुधवारी एका दिवसात शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १४७ ठिकाणे दूषित आढळून आली. मात्र, त्यातील केवळ ५ जणांनीच दंड भरल्याचे पालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. तर, १६ आॅगस्टपासून शहरातील १० हजार ८१८ ठिकाणे दूषित आढळून आली असून, त्यातील केवळ ३४० जणांनीच दंड भरला आहे. त्यामुळे दूषित ठिकाणे आणि प्रत्यक्ष कारवाई झालेली ठिकाणे यांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.