डेंगळे पुलास पर्याय
By admin | Published: October 11, 2016 02:20 AM2016-10-11T02:20:50+5:302016-10-11T02:20:50+5:30
डेंगळे पुलाला समांतर असा शहरातील सर्वांत मोठा १६२ मीटर लांब व २४ मीटर रुंद पुलाला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली
पुणे : डेंगळे पुलाला समांतर असा शहरातील सर्वांत मोठा १६२ मीटर लांब व २४ मीटर रुंद पुलाला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. या पुलाला छत्रपती शाहू सेतू असे नाव देण्यात आले असून, १४ महिन्यांमध्ये तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलासाठी १९ कोटी ८१ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
शिवाजीनगरकडून जुना बाजार, रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी १९७१ मध्ये डेंगळे पुलाची उभारणी करण्यात आली. मात्र, ५० वर्षांच्या आतच या पुलाची अवस्था खराब झाली आहे. त्यामुळे या पुलावरील जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये या पुलासाठी १२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार या पुलाला समांतर असा २४ मीटर रुंदीचा पूल बांधण्याच्या प्रस्तावास सोमवारी मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली.
शिवाजीनगर ते जुना बाजार, रेल्वे स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, सेन्ट्रल बिल्डिंग आदी महत्त्वाच्या ठिकाणांना जोडण्याचे काम डेंगळे पूल करतो. या पुलावरील वाहतूक गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती. दरम्यान, पुलाची दुरवस्था झाल्याने हा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलामुळे शहरातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून डेंगळे पुलाला समांतर पूल बांधण्याची मागणी केली जात होती. तसेच गेल्या २० वर्षांत पालिकेकडून नदीवर कोणत्याही नवीन पुलाची उभारणी करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये या पुलासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. त्याला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पुलासाठी एकूण १९ कोटी ८१ लाख रुपये खर्च येणार आहे, त्यासाठी या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये १२ कोटी रुपये उपलब्ध आहेत. उर्वरित रक्कम पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकातून उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती बाळासाहेब बोडके यांनी दिली. (प्रतिनिधी)