डेंगीला नाहीत औषधे..!
By admin | Published: June 15, 2014 03:48 AM2014-06-15T03:48:02+5:302014-06-15T03:48:02+5:30
पावसाळा सुरू झाल्याने शहरात डासांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे डेंगी, मलेरिया, चिकुनगुण्याचे रुग्ण वेगाने सापडू लागले आहेत
पुणे : पावसाळा सुरू झाल्याने शहरात डासांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे डेंगी, मलेरिया, चिकुनगुण्याचे रुग्ण वेगाने सापडू लागले आहेत. डासांचा नायनाट करण्याचे प्रयत्न आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केले जात आहेत. मात्र, डासांना मारण्यासाठी, अळ्या नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेली कीटकनाशकेच संपली असल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. सुरुवातीपासून डासोत्पत्ती थांबविली नाही तर या वर्षी शहरात डेंगी आजाराचा मोठा उद्रेक होण्याची भीती आहे. मात्र, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला गेल्या वर्षभरापासून नवी कीटकनाशके खरेदीसाठी मुहूर्तच सापडलेला नाही. कीटकनाशके नसल्याने गेल्या वर्षभरात राज्यशासनाने ३ वेळा दिलेली औषधेही संपली आहेत.
शहरात दर वर्षी पावसाळ्याच्या काळात सप्टेंबर, आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते. हे डास अनेक आजारांना निमंत्रण देतात. गेल्या २ वर्षांपासून शहरात डेंगीने थैमान घातले होते. मात्र, या वर्षी हा आजार नियंत्रणात आला होता. मात्र, आता महत्त्वाच्या घटकेलाच आरोग्य विभागाच्या कीटकनाशक विभागाकडे कीटकनाशकेच शिल्लक नसल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाने २०१२-१३ या वर्षी कीटकनाशकांची खरेदी केली होती. त्यानंतर २०१३-१४ या वर्षात कीटकनाशकांची खरेदीच करण्यात आलेली नाही, तर २०१४-१५ हे वर्ष सुरू होऊन ३ महिने उलटत आले तरी कीटकनाशकांची खरेदी करण्यात आलेली नाही.
नदी, तलावांमध्ये या काळात जलपर्णीची जोमाने वाढ होते. त्यामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याने ‘ग्लायडर’ हे कीटकनाशक त्यावर फवारले जाते. मात्र, पालिकेकडील हे कीटकनाशक डिसेंबर २०१३ मध्येच संपले आहे. त्यानंतर ६ महिने उलटत आले तरी अद्याप औषध उपलब्ध झालेले नाही.
डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी अॅबेट आणि व्हेक्टोबॅक कीटकनाशक औषधांची फवारणी केली जाते. पालिकेकडील ‘अॅबेट’ हे औषध मार्च २०१४ मध्ये संपले, त्यामुळे राज्यशासनाने मार्च २०१४ मध्ये पालिकेला अॅबेट हे औषध
थोड्या प्रमाणात दिले. मात्र तेही या महिन्यात संपले आहे. पालिकेकडील ‘व्हेक्टोबॅक’ हे औषध तर मार्च २०१३ मध्येच संपले आहे. त्यानंतर राज्यशासनाने हेही औषध पालिकेला दिले होते, तेही नोव्हेंबर २०१३ मध्ये संपले आहे. याचबरोबर एमएलओ अळ्या नष्ट करणारे औषधही आॅक्टोबर २०१३ मध्येच संपले आहे.
राज्यशासनाने पालिकेला केवळ अॅबेट, व्हेक्टोबॅक ही कीटकनाशकेच पुरविली होती, तीही संपली आहेत. या व्यतिरिक्त पालिकेकडील घरात फवारणी करण्यासाठी वापरले जाणारे बायस्टर औषध, ग्लायसोफेट ही औषधेही संपली आहेत. (प्रतिनिधी)