Dengue | पुणेकरांनो काळजी घ्या! राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही पुणे ‘टाॅप’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 12:15 PM2022-07-11T12:15:54+5:302022-07-11T12:20:02+5:30
वेळीच खबरदारी घेण्याची गरज....
-ज्ञानेश्वर भोंडे
पुणे :डेंग्यूच्या रुग्णसंख्येत राज्यात पुणे जिल्हा टाॅपवर आहे. यावर्षी जूनअखेर राज्यात डेंग्यूचे १ हजार १४६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३०५ रुग्ण पुण्यातील आहेत. ही संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. शहरातील लाेकसंख्या आणि तपासणीचे प्रमाण अधिक असल्याने ही रुग्ण संख्या जास्त असावी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पुण्यात आढळलेल्या ३०५ पैकी सर्वाधिक म्हणजे १४७ रुग्ण शहरातील आहेत. ग्रामीणमध्ये १३७ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २७ रुग्ण आढळून आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर काेल्हापूर असून, तेथे महापालिका हद्दीत ५२ आणि ग्रामीण भागात १०५ असे एकूण १५७ रुग्ण आढळले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग असून येथे ९२ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू रुग्णसंख्येबाबत राज्यात हे तीन जिल्हे टाॅप थ्री मध्ये आहेत. गेल्यावर्षी राज्यात ९६१ रुग्ण हाेते.
शहरातील चित्र-
शहरातील रुग्णसंख्या १४७ आहे. वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन महापालिकेकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. जून महिन्यात १४६ संशयितांपैकी १७ रुग्णांचे निदान झाले आहे. डेंग्यू डासांची उत्पत्ती झाल्याप्रकरणी महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने ४७० साेसायट्या व व्यावसायिक मिळकतींना नाेटिसा दिल्या आहेत. त्यापैकी ५७ नाेटिसा या जून महिन्यात दिल्या आहेत. तसेच १७ हजार दंड गाेळा केला आहे.
चिकुनगुन्यातही पुणे टाॅप
जिल्ह्यात यावर्षी जूनपर्यंत चिकुनगुन्याचे १८७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी पुणे शहर ११२, पिंपरी-चिंचवड २ आणि पुणे ग्रामीणमध्ये ७३ रुग्ण आहेत. यातही पुणे जिल्हा राज्यात टाॅपवर आहे. त्याखालाेखाल काेल्हापूर ११३, सातारा २४, सांगली २२, ठाणे, साेलापूर व अकाेला प्रत्येकी १२, पालघर १० व त्यानंतर इतर सर्व जिल्ह्यांत रुग्णसंख्या १० च्या आत आहे.
डेंग्यूचे टाॅप टेन जिल्हे (महापालिकांसह)
जिल्हा - रुग्णसंख्या
पुणे - ३०५
काेल्हापूर - १५७
मुंबई महापालिका - ११७
सिंदुदुर्ग - ९२
काेल्हापूर महापालिका - ५२
पालघर - ५०
सातारा - ४९
नाशिक - ४६
ठाणे - ४२
रायगड - २७
चिकुनगुनियाचे राज्यातील रुग्ण
जिल्हा रुग्णसंख्या
पुणे - १८७
काेल्हापूर - ११३
सातारा - २४
सांगली - २३
ठाणे, अकाेला, साेलापूर - प्रत्येकी १२
राज्यात जानेवारी ते जून २०२२ पर्यंत डेंग्यूचे ११४६ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णसंख्येत पुणे टाॅपवर आहे. तातडीने हाेणारे निदान आणि लाेकसंख्येमुळे ही रुग्णसंख्या वाढलेली आहे. त्याचबराेबर सातारा, सांगली, काेल्हापूर, नगर या जिल्ह्यांतूनही अनेक रुग्ण पुण्यात येतात. राज्याच्या कीटक प्रतिबंधक विभागाकडून सर्व जिल्ह्यांना कृती आराखडा कार्यक्रम देण्यात आला आहे. नागरिकांनी पाणी साचू न दिल्यास डेंग्यूचा प्रादुर्भाव आटाेक्यात येईल.
- डाॅ. महेंद्र जगताप, राज्य कीटक शास्त्रज्ञ
पावसाळ्यात पाणी साचून राऊ नये याकडे नागरिकांनीही विशेष लक्ष दिले पाहिजे. बहुतेक वेळा घरात फुलझाडांच्या कुंडीच्या तळाशी डासांची उत्पत्ती हाेते. तसेच टायर, पाण्याच्या उघड्या टाक्या यामध्येही डास उत्पत्ती हाेते. जुलैच्या मध्यापर्यंत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेने याबाबत धूरफवारणी सुरू केली असून नागरिकांनीही आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून त्यांची जबाबदारी पार पाडायला हवी.
- डाॅ. संजीव वावरे, साथराेग अधिकारी, पुणे महापालिका.