डेंग्यूने युवकाचा मृत्यू; नगपरिषदेला धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 03:23 AM2017-11-27T03:23:54+5:302017-11-27T03:24:00+5:30
चाकणमधील युवकाचा मृत्यू झाल्यानंतर चाकण परिसरातील नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी व नगरसेवकांनी चाकण नगरपरिषद प्रशासनाला शुक्रवारी धारेवर धरले.
आसखेड : चाकणमधील युवकाचा मृत्यू झाल्यानंतर चाकण परिसरातील नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी व नगरसेवकांनी चाकण नगरपरिषद प्रशासनाला शुक्रवारी धारेवर धरले. याबाबत नियोजन करण्यात नगरपरिषद सपशेल अपयशी ठरल्याबाबत नागरिकांचा आरोप आहे. शहरात डासांची उत्पत्ती प्रचंड प्रमाणात होत असताना प्रशासन मात्र योग्य उपाययोजना करण्यात अपयशी ठरली आहे.
चाकण नगरपरिषदेकडे धुरळणी यंत्रे पुरेशी नसल्याने धुरळणी वेळोवेळी होत नसल्याने डासांची उत्पत्ती वाढल्याचा आरोप यावेळी जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते नीलेश कड-पाटील, सतीश मंडलीक, जमीर काझी, मच्छिंद्र गोर यांनी केला. शहरात स्वच्छता नसल्याने नागरिक वारंवार आजारी पडत आहेत. मात्र, तरीही नगरपरिषद तातडीने उपाययोजना करीत नाही. याबाबत तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे केली.
यावेळी नगरसेवक शेखर घोगरे यांच्यासह नितीन जगताप, किरण कौटकर, अश्पाक शेख, शंकरराव कड, समीर सिकीलकर, प्रा. पांडुरंग शिरसाट आदींसह नागरिक
उपस्थित होते. यावेळी सफाईच्या कामातील कंत्राटदार हटवा, डेंग्यूने युवकाचा मृत्यू झाल्याने स्वच्छतेच्या कामात कसूर करणास जबाबदार अधिकाºयांवर त्वरित कडक कारवाई करा, डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी आजारांच्या रुग्णांवर सवलतीच्या दरात खासगी रुग्णालयांनी उपचार करावेत आणि साथीच्या आजारांबाबत जनजागृती व्हावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मुख्याधिकारी साबळे यांनी यावेळी सांगितले, की शहरात घरोघरी कचºयाची वाहने येत असतानाही रस्त्यावर कचरा टाकणाºया नागरिकांना प्रथम समजावून सांगण्यात येणार असून नंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
शहरात धुरळणीसाठी बंद पडलेली यंत्रे तातडीने दुरुस्त करून धुरळणी सुरू करण्यात येणार असून नवीन यंत्रे खरेदी करण्यात येतील. शहरात डेंग्यू व अन्य साथीच्या आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच धुरळणी यंत्रे तातडीने खरेदी करून सर्व प्रभागात वेळेवेळी फवारण्यात येईल, असेही आश्वासन दिले.