डेंगू हटाव मोहिमेवर फिरले पावसाचे पाणी
By admin | Published: October 8, 2014 05:21 AM2014-10-08T05:21:11+5:302014-10-08T05:21:11+5:30
शहरातील डेंगूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात आलेल्या डेंगू हटाव मोहिमेवर पावसाचे संकट ओढावले आहे
पुणे : शहरातील डेंगूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात आलेल्या डेंगू हटाव मोहिमेवर पावसाचे संकट ओढावले आहे. या मोहिमेअंतर्गत ज्या ज्या ठिकाणी पालिकेकडून साचलेले पाणी काढण्यात आले होते; तसेच औषध फवारणी केली होती, त्या ठिकाणी पुन्हा पावसाचे पाणी साठत असल्याने शहरात डेंगूची साथ पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून शहरात डेंगूच्या साथीने थैमान घातले आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीत शहरात तब्बल २६३१ डेंगूची लागण झालेले रुग्ण आढळून आले असून, अत्तापर्यंत सहा जण या आजाराने दगावलेले आहेत. त्यात एका महापालिकेच्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून मागील महिन्यात १५ दिवसांची डेंगू हटाव मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी डासांची पैदास होणारी ठिकाणे शोधणे, पाणी साठलेली ठिकाणे शोधून ती नष्ट करणे, त्या ठिकाणी औषध फवारणी करणे, त्यास जबाबदार असलेल्यांना नोटिसा बजावने, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे, खटले दाखल करणे या कामांसाठी तब्बल हजार ते दीड हजार कर्मचाऱ्यांची फौज शहरात कार्यरत आहे. ही मोहीम सुरू करण्यापूर्वी शहरात दररोज सरासरी ४० ते ४५ रुग्ण आढळून येत होते. मोहीम सुरू केल्यानंतर हा आकडा सरासरी १५ ते २० पर्यंत खाली आलेला आहे.