महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे डेंग्यूने घेतला माझ्या मुलाचा बळी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 10:47 AM2022-08-03T10:47:23+5:302022-08-03T10:47:32+5:30
नुकसान भरपाई म्हणून मागितले २० लाख : जिल्हा ग्राहक आयोगाने फेटाळला दावा
पुणे : महापालिकेने सेवा शुल्क आकारूनही नागरिकांच्या आरोग्याची व परिसराच्या स्वच्छतेची योग्य काळजी घेतलेली नाही. परिणामी डेंग्यूचा प्रादुर्भाव हाेऊन माझ्या मुलाचा मृत्यू झाला, असा ठपका ठेवत पर्वती पायथा येथील एका व्यक्तीने महापालिकेकडे २० लाख रुपये नुकसान भरपाई मागितली. मात्र ही तक्रार जिल्हा ग्राहक आयोगाने नुकतीच फेटाळून लावली आहे.
याबाबत तक्रारदाराने त्यांच्या मुलाच्या मृत्यूचे कारण डेंग्यू आजार असल्याचे अर्जात नमूद केले होते. तक्रारदार राहत असलेल्या परिसरामध्ये डेंग्यू प्रतिबंधित कारवाई व योग्य औषध फवारणी सेवाशुल्क घेऊनही योग्यरीत्या केली गेली नाही. तसेच भारतीय संविधानिक अनुच्छेद २१ अन्वये स्वच्छ व निरोगी जीवन जगण्याचा अधिकार हा महापालिकेने हिरावून घेतला आहे, असा आरोप करून महापालिकेकडे भरपाईची मागणी केली होती.
या तक्रारीत महापालिकेच्या वतीने ॲड. हृषीकेश गानू यांनी कामकाज पाहिले. तक्रारदार राहत असलेल्या परिसरामध्ये एकूण १०९ गल्ल्या आहेत. आणि त्या परिसरामध्ये डेंगू डास उत्पत्तीची (डेंगू ब्रीडिंग स्पॉट्स) अनेक ठिकाणे आहेत. या ब्रीडिंग स्पॉट्सबाबत प्रतिबंधित कारवाई करण्यासाठी महापालिकेने डास निर्मूलनाचे साप्ताहिक वेळापत्रक देखील केले आहे. या वेळापत्रकानुसार योग्य ती औषध फवारणी व कारवाई केल्याचे तसेच स्वच्छतेच्या बाबतीतील सर्व उपाययोजना, खबरदारी घेतल्याचे ॲड. गानू यांनी सांगितले. याचबरोबर डेंग्यू प्रतिबंधक औषध फवारणीनंतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या देखील घेतल्या असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. आयोगाने हा युक्तिवाद गृहीत धरून तक्रारदार यांचा नुकसान भरपाईचा अर्ज फेटाळून लावला आहे, अशी माहिती महापालिकेच्या मुख्य विधि अधिकारी निशा चव्हाण यांनी दिली.