Maharashtra: राज्यात डेंग्यूचा फास हाेताेय ढिला; रुग्ण आणि मृत्यूमध्ये घट
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: June 9, 2023 03:13 PM2023-06-09T15:13:57+5:302023-06-09T15:22:08+5:30
कीटकजन्य आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सूरू आहे...
पुणे : एडिस इजिप्टाय डासांपासून पसरणारा ‘डेंग्यू’ या विषाणुजन्य आजाराचे रुग्ण आणि मृत्यूदेखील गेल्या दाेन ते अडीच वर्षांपासून राज्यात सातत्याने घटत आहेत. यावरून राज्यात डेंग्यूचा फास ढिला हाेत असल्याची सकारात्मक बाब दिसून येत आहे.
कीटकजन्य आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सूरू आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील डेंग्यू रुग्णांची संख्या व मृत्यू याची नाेंद व त्याबाबत उपाययाेजना केल्या जातात. त्यानुसार सन २०२१ मध्ये राज्यात १२ हजार ७२० रुग्ण ४२ मृत्यू झाले हाेते. तर, सन २०२२ मध्ये ८ हजार ५७८ रुग्ण व २७ मृत्यू झाले हाेते. यावर्षी राज्यात १२३७ डेंग्यूचे रुग्णांचे निदान झाले असून एकाही रुग्णाचा अदयाप मृत्यू झालेला नाही. डेंग्यू रुग्णांचा हा उतरता ग्राफ सार्वजनिक आराेग्य विभागाच्या दृष्टीने दिलासादायक ठरत आहे, अशी माहीती साथराेग विभागाच्या सहसंचालक डाॅ. बबिता कमलापुरकर यांनी दिली.
कसा हाेताे प्रसार?
डेंग्यू रोगाचा प्रसार डेंग्यू विषाणु दुषित एडिस एजिप्टाय प्रकारातील डासाच्या मादीमार्फत होतो. माणसाला हा डेंग्यू विषाणू दुषित डास चावल्यानंतर साधारणपणे ५ ते ६ दिवसात डेंग्यू तापाची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यू तापाचे ३ प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात डेंग्यू ताप हा फल्यू सारखा आजार आहे. दुस-या प्रकारात रक्तस्त्राव युक्त डेंग्यू ताप तर तिस-या प्रकारात डेंग्यू शॉक सिड्रोंम हा तीव्र प्रकारचा रोग आहे. यामध्ये मृत्यूही होण्याची शक्यता असते.
डेंग्यू तापाच्या साथीच्या नियंत्रणासाठी करण्यात येणा-या उपाययोजना
- ताप रुग्ण सर्वेक्षण, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा यांचेमार्फत केले जाते.
- संशयित ताप रुग्णांचे रक्तजलनमुने घेऊन एन. आय. व्ही. पुणे / राज्यातील निवडक ४३ सेंटीनल सेंटर येथे विषाणू परिक्षणासाठी पाठविले जातात.
- एडिस एजिप्ताय डासांचे नमुनेही विषाणूंचा प्रकार ओळखण्यासाठी एन. आय. व्ही. पुणे कडे तपासणीसाठी पाठविले जातात.
- गरजेनुसार उद्रेकग्रस्त भागात धूर फवारणी केली जाते.
- घरातील व परिसरातील डासअळ्या आढळून आलेले पाण्याच्या साठयांमध्ये अळीनाशक टेमिफॉस वापरले जाते. कायम पाणीसाठयात गप्पीमासे सोडले जातात.