राज्यपालांना विमान प्रवास नाकारणे हा राज्य सरकारच्या मनाचा कद्रुपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:11 AM2021-02-12T04:11:48+5:302021-02-12T04:11:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आम्हाला जे हवे तेच आम्ही करणार अशी ताठर भूमिका राज्य सरकार घेत आहे. राज्यपाल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आम्हाला जे हवे तेच आम्ही करणार अशी ताठर भूमिका राज्य सरकार घेत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवास नाकारणे यातून त्यांच्या मनाचा कद्रूपणा दिसून येत आहे़ या सरकारला लोकांनी निवडून दिले नाही. त्यामुळे आम्ही जनतेला उत्तर देण्यास बांधील नाही, अशा अर्विभावात हे सरकार वागत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली़
भाजपा उद्योग आघाडीच्या प्रदेश कार्यकारीणी बैठकीनंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते़ राज्यपाल शासकीय विमानाने प्रवासाला निघाले असताना त्यांना त्या विमानातून उतरविण्यात आले हे फार दुदैर्वी आहे. त्यानंतर ते खाजगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले.
राज्य सरकाचा हा प्रकार म्हणजे सूडाचे व द्वेषाचे राजकारण आहे. भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांनी देशाच्या हितासाठी ट्वीट केले. त्या ट्वीटचेही चौकशी करण्याचे आदेश या सरकारने काढले. देशात सर्वांना अभियव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग या भारतरत्न व्यक्तींनी देशहिताप्रती आपले मत व्यक्त केले तर त्यामध्ये त्यांचा गुन्हा काय झाला असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला़
४८ तास झाले तरी काहीही कारवाई नाही
पुण्यामध्ये एका तरुणीने आत्महत्या केली. पण ४८ तास झाले तरी पोलिसांनी या गंभीर प्रकरणात काहीही कारवाई केलेली नाही. राज्य सरकारने यापूर्वी महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांची सुरक्षा व्यवस्थाही काढून घेतली. यामुळे हम करे सो कायदा असा प्रकार सध्या सरकारकडून सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी केला़