कर्णबधिरांच्या उच्च शिक्षणाला ‘तांत्रिक’ नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 03:58 AM2018-04-06T03:58:05+5:302018-04-06T03:58:05+5:30
अर्जात तांत्रिक चूक दाखवित उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कर्णबधिरांसाठीच्या महाविद्यालयाची मान्यता रोखली आहे. विशेष म्हणजे, त्रुटींची पूर्तता करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, संबंधित संस्थेला उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले आहे.
- विशाल शिर्के
पुणे - अर्जात तांत्रिक चूक दाखवित उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कर्णबधिरांसाठीच्या महाविद्यालयाची मान्यता रोखली आहे. विशेष म्हणजे, त्रुटींची पूर्तता करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, संबंधित संस्थेला उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले आहे.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात शिक्षण विभागाने नवीन महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात कर्णबधिर महाविद्यालय उभारण्याचादेखील समावेश आहे. राज्यात बारावीनंतर कर्णबधिर विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण देण्याची कोणतीच सुविधा सध्या उपलब्ध नाही. कर्णबधिर व्यक्तींना शिकविण्यासाठी सांकेतिक भाषा (साईन लँग्वेज) अवगत असणाऱ्या तज्ज्ञ शिक्षकांची आवश्यकता असते. त्या पार्श्वभूमीवर धानोरीतील श्री सद्गुरू साईबाबा सेवा ट्रस्ट संचालित सी. आर. रंगनाथन कर्णबधिर कला व वाणिज्य महाविद्यालाने कर्णबधिर-मूकबधिर विद्यालयासाठी अर्ज केला होता. त्यांना मानवविज्ञान-बी. ए. आणि वाणिज्य व व्यवस्थापन (बी.कॉम) शाखेसाठी अर्ज केला होता.
चालू वर्षांच्या अंदाजपत्रकाची प्रत जोडली नाही, पाच वर्षे कालावधीच्या मुदत ठेवीची प्रत जोडली नाही, अशा सहा त्रुटी काढल्या होत्या. संबंधित संस्थेने पुणे विद्यापीठाच्या मार्फत या त्रुटींची पूर्तता केली. विद्यापीठानेदेखील शिक्षण खात्याकडे संबंधित संस्थेची बी.ए. आणि बी. कॉम या शाखेसाठी शिफारस केली; मात्र शिक्षण विभागाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी जाहीर केलेल्या यादीत संस्थेचे नावच नाही.
संस्थेने मुदत ठेवीची रक्कम ५ वर्षांऐवजी २ वर्षे ठेवली असल्याचे उत्तर त्यात दिले आहे. विशेष म्हणजे, संबंधित मुदतठेवीची मुदत ही पुढे देखील वाढविता येते. आॅटो रिन्युअल नुसार ती ठेवण्यात आली आहे. नियमानुसार संबंधित विद्यापीठाच्या मान्यतेशिवाय ही रक्कम काढण्याचा अधिकारच या संस्थेला नाही. असे असतानाही केवळ एका तांत्रिक कारणासाठी शिक्षण विभागाने त्यांना उच्च महाविद्यालयाची
परवानगी नाकारली असल्याची माहिती श्री सद्गुरू साईबाबा सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व्ही. बी. पाटोळे यांनी दिली.
भाई वैद्य यांनीही केली होती शासनाला शिफारस
ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे २ एप्रिल रोजी नुकतेच निधन झाले. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी संबंधित संस्थेला मान्यता मिळाली नसल्याचे समजल्यावर भार्इंनी १३ मार्च ला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहिले होते. त्यात सद्गुरू साईबाबा सेवा ट्रस्टसारख्या महत्त्वाच्या महाविद्यालयाला केवळ शाब्दिक कारणासाठी मान्यता नाकारली. नोकरशाहीने शाब्दिक रचनेप्रमाणे मुदतठेवीची रक्कम ५ वर्षांसाठी न केल्याने मान्यता नाकारली आहे. विद्यापीठाने शिफारस केल्यानंतर मान्यता द्यायला हवी होती. हे पत्र आपण स्वत: तपासावे आणि आपल्या कार्यकालात कर्णबधिर महाविद्यालय सुरूव्हावे, असे या पत्रात म्हटले आहे.
...तर कर्णबधिर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या १२वीच्या परीक्षेत राज्यात १ हजार १३४ बहिरे आणि ११० मुके विद्यार्थी बसले होते. त्यात पुणे विभागात १८८ बहिरे आणि १९ मुके विद्यार्थी होते. धानोरीच्या
सी. आर. रंगनाथन कर्णबधिर विद्यालयात २०१५-१६मध्ये ३९, तर २०१६-१७ मध्ये ३४ विद्यार्थ्यांंनी १२वीची
परीक्षा दिली होती. अनुक्रमे २८ आणि ३१ विद्यार्थी
उत्तीर्ण झाले. या वर्षीच्या परीक्षेला ४७ विद्यार्थी बसले आहेत. उच्च शिक्षणाची सोय नसल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिफारशीनंतरही शिक्षण विभागाने तांत्रिक कारणावर पदवी अभ्यासक्रमास नकार दिला आहे. पुणे विद्यापाठांतर्गत कर्णबधिर महाविद्यालयाचा हा एकमेव प्रस्ताव होता. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी ४ जून रोजी होणार आहे. त्या वेळी जरी अनुकूल निर्णय झाल्यास आमची अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी आहे.
- व्ही. बी. पाटोळे, अध्यक्ष, श्री सद्गुरू साईबाबा सेवा ट्रस्ट
1 राज्यात २०११च्या जनगणनेनुसार अंध, अस्थिव्यंग, बहिरे, मतिमंद, मानसिक आजार, बहुविकलांग असे विविध स्वरूपाचे अपंगत्व असणारे १६ लाख ९२ हजार २८५ पुरुष आणि २९ लाख ६३ हजार ३९२ स्त्रिया दिव्यांग आहेत.
2अशा एकूण २९ लाख ६३ हजार ३९२ दिव्यांग व्यक्तींपैकी मुके असणाºया स्त्री व पुरुषांचे प्रमाण हे ४ लाख ७३ हजार ६१० आणि बहिरे असणाºया स्त्री-पुरुषांचे प्रमाण ४ लाख ७३ हजार २७१ इतके आहे.