दंतप्रत्यारोपण - एक आधुनिक उपचारपद्धती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:11 AM2021-05-23T04:11:40+5:302021-05-23T04:11:40+5:30
मनुष्याला नैसर्गिकरित्या दोन वेळा दात येतात. दुधाचे दात व नंतर ते पडल्यावर कायमस्वरूपी दात येतात. दुधाचे दात, बेबी तीथ ...
मनुष्याला नैसर्गिकरित्या दोन वेळा दात येतात. दुधाचे दात व नंतर ते पडल्यावर कायमस्वरूपी दात येतात. दुधाचे दात, बेबी तीथ 20 असतात त्यांची भूमिका कायमस्वरूपी दात येईपर्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांची काळजी घ्यावी. कायमस्वरूपी दात 32 असतात. कायमस्वरूपी दात व्यवस्थित राहण्यासाठी त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी.
सतत गोड खाणे, योग्यरीत्या दात न घासणे, खाण्याच्या चुकीच्या सवयी इ. मुळे दात कीडू शकतात, पडू शकतात. अशावेळी दातावर योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. पूर्वी दात पडल्यास पूर्ण कवळी किंवा अर्धी कवळी बसवायचे नंतर दंतवैद्यकीयशास्त्राने खूप प्रगती केली. त्यामुळे कवळीऐवजी पडलेला दात क्राऊन अणि ब्रिज पद्धतीने बसविले जाऊ लागले. त्याचे काही फायदे व तोटे आहेत. ही उपचार पद्धती करत असताना आजूबाजूने दात घासून (crown preparation/ cutting) क्राऊन व ब्रिज करावे लागतात. परिणामी बाजूचे दात कमजोर व सेन्सिटिव्ह होण्याची शक्यता असते. आताच्या आधुनिक उपचारपद्धतीमध्ये याची जागा दंतप्रत्यारोपण (Dental Implant) ने घेतले आहे. जो दात नाही त्याठिकाणी आधुनिक उपचाऱ्यांच्या पद्धतीने दंतप्रत्यारोपण केले जाते. अगोदरचे जुने दंतरोग तज्ज्ञ मजेने रुग्णांना म्हणायचे कायमचा दात पडल्यानंतर देवाने ठरवले तरी आता तो दात येणार नाही. पण खरेतर या उपचारपद्धतीने रुग्णांना तिसऱ्यांदा दात मिळणे शक्य झाले आहे.
दंत प्रत्यारोपण म्हणजे काय?
दात नसलेल्या जागी (Missing Tooth) टायटॅनियम या धातूचा जबड्याच्या उंची व रूंदी यानुसार स्क्रूवरचा किंवा खालचा जबडा येथे बसविला जातो. दंत प्रत्यारोपण हाडांमध्ये स्थिर होऊन तो दातांच्या रूटप्रमाणे (मूळ) काम करतो आणि त्यावर आपण नंतर Abutment Screw बसविला जातो व त्यावर सिरॅमिक कॅप बसविली जाते. या पद्धतीने बसविलेले दात खऱ्या दातासारखेच दिसतात. खरेतर आपल्या देशात दातांची ट्रीटमेंट फार गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. दातांची नियमित तपासणी केली पाहिजे पण तसे काही होताना दिसत नाही. दंत प्रत्यारोपण किंवा दातांच्या आधुनिक उपचार पद्धतीसाठी रुग्णांना खूप वेळ, संयम आणि व्हिजिट्स द्याव्या लागतात.
* दंत प्रत्यारोपण कोणामध्ये करता येते?
- वय-16 वर्षे पूर्ण झाल्यावर वरचा जबडा, खालचा जबडा हाड उंची व रुंदी भरपूर असणे. शारीरिक तंदुरुस्ती ज्यांची आहे, त्यांना करता येते.
प्रत्यारोपणाचे फायदे काय?
इम्पलान्ट्स खराब होत नाही, तसेच किडत नाही. या उपचार पद्धतीत कमीत कमी शस्त्रक्रिया असल्यामुळे यात फारशा वेदना, रक्तस्राव व सूज येण्याचा प्रकार नाही. कॅड कॅम तंत्रज्ञानद्वारे करण्यात येणारे हे नवीन प्रोस्थेसिस स्वच्छ करणे व त्यांची देखभाल करणे हे अधिक सोपे आहे. मुख्य म्हणजे इम्पलान्ट्स दीर्घ काळ टिकतात. शिवाय आर्थिकदृष्ट्या आता ते सर्वसामान्यांना परवडण्याजोगे झाले आहेत.
इम्पलान्ट्स करण्याची पद्धत शस्त्रक्रिया सोपी आहे. डेंटल इम्पलान्ट्ससाठी पेशंटचे ओरल कॅव्हिटी, मुख निदान व्यवस्थित करून, सर्व शक्यता तपासून ही टीटमेंट वेल प्लॅंड करायची असते. अगोदर सर्व तपासण्या, इम्पलान्ट्स सायझेस, बोन ग्राफ्ट, लागणारे इन्स्ट्रुमेंट्स याची तयारी करावी लागते.
या शत्रक्रियेसाठी विविध आधुनिक मशिनरीची आवश्यकता असते. तसेच यामध्ये निर्जंतुकीकरण (Sterilization) फार महत्त्वाचे असते. सर्व सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स आधुनिक पद्धतीने निर्जंतुकीकरण केले जाते. त्यामुळे या शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच इम्पलान्ट्स बसवत असताना जबड्याच्या हाडाची क्षमता, रुंदी आणि उंची यानुसार काही विशिष्ट सहायक शस्त्रक्रिया कराव्या लागतात. सहायक शस्त्रक्रिया फार कमी दंतरोग तज्ज्ञ करतात. यासाठी तशा प्रकारची सुविधा, सामग्री, तज्ज्ञ आवश्यक आहेत. या उपचार पद्धतीसाठी रुग्णांचा संयम, वेळ, इच्छाशक्ती आणि खर्च याची आवश्यकता असते. या ट्रीटमेंटसाठी अंदाजे 6 महिने ते 9 महिने इतका कालावधी लागतो. यामध्ये आपण कृत्रिम हाडांची भुकटी, पावडर किंवा झिनोग्राफट ही हाडाची पावडर भरून सायनस मेम्बरन लिफ्ट करतो. त्यामुळे हाडांची उंची वाढविण्यासाठी मदत होते.
* * * * * * * * * *
डेंटल इम्पलान्ट्बद्दल गैरसमज
- 1.एमआरआय करता येत नाही :
बऱ्याचदा काही लोकांमध्ये हा गैरसमज आहे पण इम्पलान्ट्स हे टायटॅनियम धातूचे आहेत. त्यामुळे तुम्ही पूर्ण शरीराचा एमआरआय करू शकता.
2.डोळ्याची दृष्टी कमी होते : बऱ्याचदा काही लोकांमध्ये हा गैरसमज आहे दात काढल्यावर किंवा इम्पलान्ट्स केल्यावर डोळ्यांची नजर कमी होते हे पूर्णपणे चुकीचं आहे.
इम्पलान्ट्स शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सूचना पाळाव्यात व दिलेली औषधे घ्यावीत.
चांगल्या दातांमुळे रुग्ण व्यवस्थित खाऊ शकतो, यामुळे रुग्णाला एक पूर्णपणे नवीन व मोहक असे स्मितहास्य मिळते. या कृत्रिम दातांचा उपयोग त्या व्यक्तीला अर्थातच अन्न चावण्यासाठी तसेच आरोग्य व रूप सुधारण्यासाठी होतो.
* * * * * * * * * *
देखभाल आणि काळजी प्रोस्थेसिस टूथब्रश किंवा फ्लोस्सरच्या मदतीने दात चांगले स्वच्छ करायला हवे, जेणे करून हिरड्यांच्या समस्या निर्माण होऊ नये. दातांचे आरोग्य चांगले आहे ना, तसेच आपल्याला अन्नपदार्थ नीट चावता येतात ना, याची खात्री करण्यासाठी दर सहा महिन्यांनी किंवा वर्षाने डॉक्टरांची फॉलोअप भेट घ्यावी.
- डाॅ. संतोषकुमार मस्तूद