रंगात रंगला देऊळवाडा
By admin | Published: February 14, 2015 11:02 PM2015-02-14T23:02:03+5:302015-02-14T23:02:03+5:30
ढोलताशाच्या गजरात मानकरी जमदाडे यांच्या वतीने श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या अंगावर मानाच्या रंगाचे शिंपण (मारामारी) होऊन व फुलांची उधळण होत दहा दिवसांच्या यात्रेची सांगता झाली.
खळद/वीर : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे सुमारे अडीच लाख भाविकांच्या उपस्थितीत देऊळवाड्यात मानाच्या काठ्या, पालख्या यांच्या उपस्थितीत ढोलताशाच्या गजरात मानकरी जमदाडे यांच्या वतीने श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या अंगावर मानाच्या रंगाचे शिंपण (मारामारी) होऊन व फुलांची उधळण होत दहा दिवसांच्या यात्रेची सांगता झाली. या वेळी संपूर्ण परिसर ‘सवाई सर्जाचं चांगभलं’च्या भव्य गजराने दुमदुमून गेला. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी सकाळपासूनच लाखो भाविक मंदिरात मिळेल त्या ठिकाणी जागा धरून बसले होते. या वेळी राज्यभरातून तसेच कर्नाटक राज्यातून भाविक उपस्थित होते.
सकाळी देवांना अभिषेक, नित्य पूजा आदी सर्व धार्मिक विधी पार पडले. १२ वाजता कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे (कसबा पेठ), वीर, वाई, सोनवडी या मानाच्या काठ्या, पालख्या ढोलताशाच्या गजरात देऊळवाड्यात आल्या. मंदिराला एक प्रदक्षिणा झाल्यावर तलवार खेळण्याचा कार्यक्रम झाला व दुपारी दीड वाजता कासवाच्या दोनही बाजूंना दादा बुरुंगले व तात्या बुरुंगले यांच्या अंगात देवाचा संचार होऊन पंचमीपासून सुरू झालेली वार्षिक पीकपाणी भविष्यवाणी भाकणूक आजही झाली.
यंदा पावसाला वेळेवर सुरुवात होणार आहे. मृग नक्षत्रात चारही खंडात चांगला पाऊस पडेल. हत्तीचा पाऊस समाधानकारक पडेल. खरीप हंगामातील पिके समाधानकारक येणार आहेत. वेळेवर पेरणी करेल तो शेरास सव्वाशेर पीक काढेल. बाजरीचे पीक जोमदार येईल, तर उत्तरा-पूर्वाही चार खंडांत पडतील.
(वार्ताहर)
४ गाईगुरांना, शेळ्या-मेंढ्यांना पुरेसा चारा उपलब्ध होणार, अशी भाकणूक केली. भाकणूक ऐकताना वातावरण एकदम भक्तिमय होऊन गेले होते. दुपारी दोन वाजता पाच मानकरी, शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्होटकर, ढवाण, दागिणदार, सालकरी, पाटील, देवस्थानचे पंच, भाविक यांच्या उपस्थित रंगाचे मानकरी माथेरानचे भारत जमदाडे,चंद्रकांत जमदाडे, मधुकर जमदाडे, रघुनाथ जमदाडे, नारायण जमदाडे यांनी मुख्य मानाच्या रंगाची शिंपण केली. या वेळी आपल्या अंगावर रंग पडावा यासाठी देऊळवाड्यात पश्चिम दरवाजाजवळ भाविकांची मोठी झुंबड उडाली होती.
४दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व काठ्या, पालख्या प्रदक्षिणा पूर्ण करून आपापल्या ओट्यावर गेल्या व पुढे त्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. या वेळी सर्व रस्ते बैलगाडी व तर वाहनांच्या गर्दीने फुलून गेले होते.