जगद्गुरू तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 06:16 AM2020-06-13T06:16:03+5:302020-06-13T06:16:23+5:30
मोजक्या वैष्णवांची उपस्थिती; पैठणला नाथमहाराजांच्या पालखीचेही प्रस्थान
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३५ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवारी दुपारी मोजक्या वैष्णवांच्या उपस्थितीत साधेपणाने परंतु विधीवत झाले. कोरोनामुळे आषाढी पायी सोहळा रद्द झाला असला तरी ५० भाविकांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे प्रस्थान सोहळ्यास जिल्ह्याधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. त्यापार्श्वभूमीवर देहूत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. देहूत येणारे सर्व मार्ग पोलिसांनी बंद करून बाहेरच्या लोकांना प्रवेशबंदी केली होती.
दुपारी अडीचच्या सुमारास संस्थानचे अध्यक्ष मधुकरमहाराज मोरे यांच्या हस्ते प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. आषाढी वारीत सहभागी झालेले वारकरी खांद्यावर पताका, तर केवळ एकमेव महिला डोक्यावर तुळशीवृंद घेऊन मुखी हरिनामासह ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष करीत होते. परंपरेप्रमाणे सर्व विधी पार पडल्यानंतर सोहळा सायंकाळी भजनी मंडपात विसावला. सर्वांनी मास्क लावला होता.
पैठण (जि. औरंगाबाद) येथे नाथमहाराजांच्या पालखीने मोजक्या मानकऱ्यांसह नाथ मंदिरातून प्रस्थान केले. १७ दिवस पालखी समाधी मंदिरात मुक्कामी राहील. त्यानंतर शासकीय निर्देशानुसार पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
माऊलींच्या सोहळ््याचे आज प्रस्थान
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा शनिवारी श्री क्षेत्र आळंदी येथे होणार आहे. पालखी १७ दिवस आजोळ घरीच राहणार आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार आषाढ शुद्ध दशमीला माउलींच्या चल पादुका हेलिकॉप्टर अथवा बसने पंढरपूरला विठुरायाच्या भेटीला घेऊन जाणार आहेत.