मानाच्या पालख्यांचे आज २० ‘शिवशाही’तून वाखरी तळाकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:01+5:302021-07-19T04:08:01+5:30
आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. हरिभक्तीत दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या ...
आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. हरिभक्तीत दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत. हा मान एसटी महामंडळाला मिळाल्याबद्दल परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे.
मंगळवारी (दि. १९) या बसेस पालख्यांसोबत पंढरपूरकडे रवाना होतील. या बसेस विविध आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहेत. पालख्यांचा मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास शिवशाही बसमधून होणार आहे.