माऊलींच्या चलपादुकांचे उद्या पंढरीला प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:07 AM2021-07-18T04:07:59+5:302021-07-18T04:07:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आळंदी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीचे स्वरूप बदलून आषाढ शुद्ध दशमीला संतांच्या पादुका बसद्वारे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीचे स्वरूप बदलून आषाढ शुद्ध दशमीला संतांच्या पादुका बसद्वारे थेट पंढरीत पोचविण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार माऊलींच्या चलपादुका सोमवारी (दि. १९) सकाळी नऊच्या सुमारास आळंदीतील आजोळघरातून पंढरपूरला प्रस्थान ठेवतील. दोन एसटी बसद्वारे अवघ्या चाळीस व्यक्तींसोबत विनाथांबा ही वारी वाखरीपर्यंत नेण्यात येणार आहे. दरम्यान, वारीच्या प्रवास मार्गांवर गावोगावी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाकडून संपूर्ण वारी ने-आण करण्याची जबाबदारी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारी म्हणून गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील मानाच्या संतांच्या पादुका पंढरीत नेण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. यापार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा ज्येष्ठ वद्य सप्तमीला तर तीर्थक्षेत्र आळंदीतून ज्येष्ठ वद्य अष्टमीला माऊलींच्या चलपादुकांचे प्रस्थान करण्यात आले होते. मात्र त्या दिवसापासून संतांच्या पादुका देहू व आळंदीतच मुक्कामी आहेत.
या पार्श्वभूमीवर माऊलींच्या चलपादुका पंढरीला नेण्यासाठी शासनाकडून दोन शिवनेरी बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या बसमध्ये प्रत्येकी वीस व्यक्तींना पादुकांसोबत जाण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे पादुकांसोबत ६५ वर्षांच्या आतील निमंत्रित व्यक्तीला प्रवेश दिला जाणार असून, संबंधित व्यक्तींची कोरोना टेस्ट केली असल्याची माहिती सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे-पाटील यांनी दिली.
चौकट :
यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे नमूद केले आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी केली जाणार आहे. कालाच्या कार्यक्रम पार पडल्यानंतर पैार्णिमेच्या (दि. २३) दिवशी वारी परतीसाठी आळंदीकडे प्रस्थान ठेवेल.
फोटो ओळ : माऊलींच्या पादुकांपुढे रंगले भारुड... तीर्थक्षेत्र आळंदीत प्रस्थाननंतर माऊलींच्या चलपादुका गांधीवाड्यात विराजमान आहेत. त्या ठिकाणी दैनंदिन विधिवत पूजा, कार्यक्रम सुरू आहे. याचाच भाग म्हणून माऊलींच्या समोर विनोदी भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला. (छाया : भानुदास पऱ्हाड)