मोरया...! ढोल- ताशांच्या गजरात मंगलमूर्तींच्या पालखीचे मोरगावकडे प्रस्थान

By विश्वास मोरे | Published: September 4, 2024 06:38 PM2024-09-04T18:38:58+5:302024-09-04T18:40:28+5:30

मिरवणुकीत चिंचवडमधील समस्त ग्रामस्थांसोबत महिलांचा लक्षणीय सहभाग होता

Departure of Mangal murti palkhi to Morgaon amid the sound of drums and clocks | मोरया...! ढोल- ताशांच्या गजरात मंगलमूर्तींच्या पालखीचे मोरगावकडे प्रस्थान

मोरया...! ढोल- ताशांच्या गजरात मंगलमूर्तींच्या पालखीचे मोरगावकडे प्रस्थान

पिंपरी:  मोरया, मोरया... चा जयघोष, ढोल- ताशांच्या गजरात दिमाखदार मिरवणूक काढून बुधवारी चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. भाद्रपदी यात्रेसाठी मोरगावकडे  प्रस्थान ठेवले. पुण्यात पालखीचा पहिला मुक्काम आहे.   

चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यात चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी समग्र पूजाविधी झाल्यावर श्री मंगलमूर्तींची स्वारी हाती घेतली त्यानंतर, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विध्वांस, ॲड.देवराज डहाळे यांनी मंगलमूर्तीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मोरया गोसावी देव मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र देव यांनी श्री मंगलमूर्तींच्या स्वारीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ढोल - ताशाच्या गजरात पालखी श्री मोरया गोसावी समाधी मंदिराकडे मार्गस्थ झाली. तेथे श्री मोरया गोसावी आणि सप्त सत्पुरुषांच्या समाधीची श्री  मंगलमूर्तींची  भेट मंदार महाराज देव यांनी घडविली.  चिंचवडमधील समस्त ग्रामस्थ या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले होते. मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. 

डाळीचा प्रसाद 

मंदार महाराज देव यांच्या हस्ते भाविकांना डाळीच्या प्रसादाचे वाटप केले. सोहळ्यात उपस्थित माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजाभाऊ गोलांडे, नाना काटे, सुरेश भोईर, मधुकर चिंचवडे मास्तर, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, विजय गावडे उपस्थित होते. त्यानंतर वाद्यांचे पूजन केले. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. यावेळी भाविकांनी मोरयाच्या नामाचा प्रचंड जयघोष केला. या भव्य मिरवणुकीत पुण्यातील नामवंत श्रीगजलक्ष्मी ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. त्यानंतर समाधी मंदिर, गांधीपेठ, पावर हाउस चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाने भाटनगर, मुंबई-पुणे महामार्ग, खडकी, वाकडेवाडी, शनिवारवाडा, लक्ष्मीरस्त्याने जाऊन एकनाथ मंगल कार्यालयाकडे पालखी मार्गस्थ झाली. एकनाथ मंगल कार्यालयातच पालखीचा मुक्काम असेल.  

असा आहे मार्ग  

गुरुवारी पहाटे साडेचार वाजता पालखी प्रस्थान करेल. एकनाथ मंगल कार्यालयातून भवानीपेठ, रामोशी गेट, भैरोबा नाला, दिव्य वाटिका आश्रम, दिवेघाट, सासवड बाजारातून कऱ्हाबाई मंदिरात दुसरा मुक्काम असेल, पालखी शुक्रवारी सकाळी मंदिरातून शिवरी, रासकर मळ्याच्या दिशेने निघेल. श्री क्षेत्र जेजुरी, मावडी, ढोले मळामार्गे मोरगाव येथे रात्री नऊ वाजता पालखी पोहोचेल. त्यानंतर शनिवार आणि रविवारी पालखीचा मुक्काम मोरगाव येथेच असेल. ९ सप्टेंबरपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. श्री क्षेत्र जेजुरी, श्री कऱ्हाबाई मंदिर सासवड, दिव्य वाटिका आश्रम वडकी ,एकनाथ मंगल कार्यालय,पुणे या ठिकाणी मुक्काम करीत १३ सप्टेंबरला पालखी पुन्हा चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यात येईल.

Web Title: Departure of Mangal murti palkhi to Morgaon amid the sound of drums and clocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.