Ashadhi Wari: संत सोपानकाका पालखीचे टाळ - मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 03:35 PM2023-06-15T15:35:01+5:302023-06-15T15:36:40+5:30
हजारो भाविकांकडून माऊली व सोपानकाकांचा जयघोष आणि फुलांची उधळण
गणेश मुळीक
सासवड : माझ्या वडिलांची मिरासी गा देवा ।
तुझी चरण सेवा पांडुरंगा ॥१॥
उपवास पारणे राखिला दारवंटा ।
केला भोगवटा आह्मां लागी ॥२॥
वंश परंपरा दास मी अंकिता ।
तुका मोकलिता लाज कोणा ॥३॥
हा परंपरेचा अभंग होऊन दुपारी ठीक एक वाजता संत सोपानकाकांच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन देऊळवाड्याच्या उत्तर दरवाजातून पालखी बाहेर पडली. या वेळी हजारो भाविकांनी माऊली व सोपानकाकांचा जयघोष केला. फुलांची उधळण केली. भाविकांनी पालखी खांद्यावर घेऊन सासवड गावातून मिरवत जेजुरी नाक्यापर्यंत आणली. त्याप्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा हजारो भाविकांनी पालखी दर्शनाचा लाभ घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात, ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात, भगव्या पताकांच्या गर्दीत हजारो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी दि. १५ जून रोजी सासवडवरून उत्साही वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
सकाळी मंदिरात पहाटे ४ वाजता काकड आरती, महापूजा व धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर पहाटे ५ पासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी अकरा वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरूवात झाली.यावेळी परंपरेनुसार मानकरी आण्णासाहेब केंजळे व देवस्थानचे मुख्य विश्वस्त अॅड. त्रिगुण गोसावी यांनी धार्मिक विधी करून व पाच सुवासिनी हस्ते ओवाळून आरती होवून श्रीं च्या पादुका देऊळ वाड्यातील पालखीत आणून ठेवण्यात आल्या. प्रमुख दिंड्या देऊळवाड्यात आल्यानंतर परंपरेचे अभंग झाले.विणेकरी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यानंतर देवस्थान व संत सोपानकाका बँकेचे वतीने श्री विठ्ठलाची मुर्ती व सोपानदेवी ग्रंथ देऊन विणेकरी व दिंडी चालकांचा सत्कार करण्यात आला. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सासवड येथे मुक्काम असल्याने संत सोपानदेवांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती. यावर्षी पालखीपुढे दिंड्यांची वाढ झाली असून एकुण १०२ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. परकाळे व संत सोपानकाका बँकेचा एक असे पालखीपुढे दोन अश्व असून सोरटेवाडीचे केंजळे बंधूची बैलजोडी आहे. पालखी प्रथम मुक्कामासाठी पांगारे कडे मार्गस्थ झाली.