संत ज्ञानेश्वर माऊलींचे आषाढी वारीसाठी प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 09:13 AM2021-07-03T09:13:36+5:302021-07-03T09:14:22+5:30
टाळांचा गजर व मृदंगाच्या निनादात अलंकापुरी दुमदुमली
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव(जि.पुणे) : मोजके वारकरी आणि टाळकरी असले तरी आकाशाला गवसणी घालणारा टाळमृदंगाचा खणखणाट आणि ‘ज्ञानोबा ज्ञानोबा’च्या जयघोषासह उत्साहपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले. यंदाचे पालखी सोहळ्याचे १९० वे वर्ष आहे.
पहटेपासून उत्साह
प्रस्थान सोहळ्याला शुक्रवारी पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. त्यानंतर माउलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा करण्यात आली. विणामंडपात सकाळी दहानंतर ह.भ.प. भगवान महाराज कबीर यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माऊलींना नैवद्य दाखविण्यात आला. सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात झाली. ब्रम्हवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात आला. सोहळ्यासाठी मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी आदींना मंदिरात प्रवेश देण्यात आला. मानाचे दोन्ही अश्व मंदिरात आणून प्रदक्षिणा घालण्यात आली. माउलींची व गुरू हैबतबाबांची आरती घेऊन देवस्थानच्या विश्वस्तांकडून माउलींच्या चांदीच्या चलपादुका परंपरेनुसार पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांच्याकडे सुपूर्द करून चलपादुकांचे मंदिरातून प्रस्थान ठेवण्यात आले. रात्री समाजआरती झाल्यानंतर पालखी आजोळघरी मुक्कामी गेली असून १८ जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम आळंदीतच राहणार आहे.
३७ वारकरी पॉझिटिव्ह
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुकांची शुक्रवारी प्रस्थान
ठेवले. या पार्श्वभूमीवर निमंत्रित ३०४ वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. चाचणीत आळंदीच्या नगराध्यक्षांसह तब्बल ३७ वारकऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.